मुंबई : गोरेगाव (पश्चिम) मोतीलाल नगरातील रहिवाशांना लॉकडाऊन काळातील थकीत घरभाडे म्हाडाने माफ करावे अथवा सवलत देऊन मध्यमवर्गीय रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. गोरेगाव विधानसभा संघटक व माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांनी म्हाडाचे मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती डॉ. विनोद घोसाळकर यांची शिष्टमंडळाद्वारे नुकतीच भेट घेऊन केली आहे.
लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, धंदे-रोजगार बुडाले, आर्थिक चणचण झाली आहे, अशा बिकट परिस्थितीत मोतीलाल नगरातील मध्यमवर्गीय रहिवाशांना म्हाडाच्या घराचे थकीत एकरकमी भाडे भरणे आर्थिकदृष्ट्या जिकिरीचे झाले आहे, अशी व्यथा दिलीप शिंदे यांनी यावेळी सभापती घोसाळकर यांच्याकडे मांडली तसेच मोतीलाल नगराचा पुनर्विकास म्हाडाने करावा. येथील खोल्यांचे दरमहा म्हाडाकडून घेतले जाणारे भाडे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात यावे. म्हापे येथील म्हाडाच्या मूळ कागदपत्रांचे स्कॅनिंगबाबत दिरंगाई होत आहे. याबाबत आपण लक्ष घालून स्कॅनिंग कामाची होणारी दिरंगाई दूर करावी, अशाही मागण्यांकडे घोसाळकर यांचे लक्ष वेधण्यात आले.
सभापती घोसाळकर यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक मार्ग काढण्यात येईल. म्हाडाचे उपाध्यक्ष डिग्गीकर यांच्यासोबत मोतीलाल नगरातील प्रश्नांवर पुढील आठवण्यात रहिवाशांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन तसेच थकीत घरभाड्याच्या संदर्भात म्हाडाचे मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी म्हसे यांच्याकडे घोसाळकर यांनी तातडीने विचारणा केली. त्यावर चर्चा करून शासनदरबारी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन म्हाडाचे म्हसे यांनी दिले.
---