Join us

मास्टर लिस्टमध्ये पारदर्शकता आणण्यास म्हाडाचे सॉफ्टवेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2019 6:51 AM

मुंबई : मुंबईतील उपकरप्राप्त इमारतीतील (सेस) इमारतींच्या मास्टर लिस्ट नोंदीलाही ऑनलाइनची जोड देत मास्टर लिस्टमध्ये होणारे घोटाळे रोखण्यासाठी म्हाडाने ...

मुंबई : मुंबईतील उपकरप्राप्त इमारतीतील (सेस) इमारतींच्या मास्टर लिस्ट नोंदीलाही ऑनलाइनची जोड देत मास्टर लिस्टमध्ये होणारे घोटाळे रोखण्यासाठी म्हाडाने आधुनिक प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय म्हाडामार्फत घेण्यात आला आहे. मास्टर लिस्टसाठी म्हाडाने एक सॉफ्टवेअर तयार केले असून नागरिकांना यामध्ये नोंदणी करण्याचे आवाहन म्हाडामार्फत करण्यात येणार आहे. याबाबत म्हाडाच्या मुख्यालयामध्ये शुक्रवारी सादरीकरण पार पडले. यातून पारदर्शकता निर्माण करण्यात येत असल्याचा दावा म्हाडाने आणि आर. आर. मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी या वेळी केला.

मास्टर लिस्टच्या ऑनलाइन नोंदणीमुळे या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येणार असून आमच्याकडे संपूर्ण माहिती जमा होणार असल्याचे मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी दिनकर जगदाळे या वेळी म्हणाले. निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतरच ही यंत्रणा कार्यान्वित होणार असल्याचेही ते या वेळी म्हणाले. या ऑनलाइनच्या साहाय्याने मूळ रहिवाशांची नोंद झाल्याने घुसखोरांचा प्रश्न आपसूकच निकालात निघणार आहे.

म्हाडाने २००८ मध्ये संक्रमण शिबिरातील रहिवाशांची यादी तयार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अद्ययावत पद्धतीने कोणतीही यादी तयार झालेली नसल्याने बायोमेट्रिकपाठोपाठ आॅनलाइन नोंदणीस अनन्यसाधारण महत्त्व लाभणार आहे. या यादीसह मास्टर लिस्टमधील नोंदीतील संशयाचे धुके नेहमीच टीकेचा विषय ठरला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काही अधिकारी, कर्मचारी, राजकीय नेते-कार्यकर्ते, दलालांच्या संगनमताने मास्टर लिस्टमधील यादीत हस्तक्षेप होत असल्याचा आरोप वारंवार केला जातो. या सर्व आरोप-प्रत्यारोपावर नियंत्रण आणण्यासाठी ऑनलाइनची मदत मिळेल, असे सूत्रांनी सांगितले.

 

टॅग्स :म्हाडा