निकाल लागला, कर्मचारी गेले कुठे? म्हाडा, एसआरए, महापालिकेचे कर्मचारी निवडणूक ड्युटीवरच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 03:21 PM2024-11-27T15:21:01+5:302024-11-27T15:22:28+5:30
म्हाडा, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए), महापालिकेसह विविध प्राधिकरणांच्या कर्मचाऱ्यांना अद्याप विधानसभा निवडणुकीच्या कामांतून मुक्त करण्यात आलेले नाही.
मुंबई :
म्हाडा, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए), महापालिकेसह विविध प्राधिकरणांच्या कर्मचाऱ्यांना अद्याप विधानसभा निवडणुकीच्या कामांतून मुक्त करण्यात आलेले नाही. त्यामुळे संबंधित प्राधिकरणांची कामे खोळंबल्याचे चित्र आहे. परिणामी, नागरिकांची गैरसोय होत आहे.
वांद्रे येथील महावितरणच्या कार्यालयातील ५० टक्के कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाची ड्युटी लावण्यात आली होती. यातील वरिष्ठ अधिकारी कार्यालयात रुजू झाले असले तरी कनिष्ठ अधिकारी किंवा कर्मचारी अद्याप रुजू झालेली नाहीत. त्यामुळे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे. त्याचबरोबर वांद्रे येथील ‘एसआरए’च्या मुख्यालयातील ५० टक्के कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी पाठविण्यात आले होते. यापैकी वरिष्ठ अधिकारी कामावर रुजू झाले आहेत. उर्वरित कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामातून मुक्त करण्यात आलेले नाही. पुढील दोन ते तीन दिवसांत उर्वरित कर्मचारीही कार्यालयीन कामात रुजू होतील, अशी माहिती ‘एसआरए’मधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
- ‘म्हाडा’च्या ६० टक्के कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामावर पाठविण्यात आले होते. निवडणुकीचे निकाल लागले तरी अद्याप हे कर्मचारी कार्यालयात पुन्हा रुजू झालेले नाहीत.
- एका कर्मचाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, निवडणुकीच्या ड्यूटीवरील कर्मचाऱ्यांना आणखी काही दिवस या कामातून मुक्त केले जाणार नाही. त्यामुळे म्हाडाच्या कार्यालयात विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे.
- गेल्या दीड महिन्यापासून बहुतांशी कामे झालेली नाहीत. काही कर्मचाऱ्यांना महिनाभर, तर काहींना शेवटचे दोन-तीन दिवस निवडणुकीची ड्युटी होती.
- हे कर्मचारी अद्याप परतलेले नसल्याने म्हाडाच्या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत असून, त्यांची कामे होण्यासाठी आणखी काही दिवस लागणार आहेत.
साप्ताहिक सुट्टी नाही, तणावाखाली काम
एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, गेल्या दीड महिन्यापासून आम्हाला साप्ताहिक सुट्टी घेता आलेली नाही. प्रत्येकाने तणावाखाली काम केले आहे. थोड्या जरी चुका झाल्या तरी निलंबनाची कारवाई केली जात होती. एक-दोन अधिकाऱ्यांना काही चुकांमुळे निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे यातील अनेकांना आरामाची गरज आहे.
...येथेही मोजकाच स्टाफ
राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) काही कर्मचारी अनेक महिन्यांपासून निवडणूक ड्युटीवर असून त्यांना कार्यमुक्त केलेले नाही. तर, काही कर्मचारी मतदानाच्या दिवशी आणि मतमोजणीसाठी विविध कार्यालयांतून घेतले होते. यातील बहुतांश कर्मचारी सोमवारीच आपापल्या कार्यालयात रुजू झाले आहेत. मात्र मतदार नोंदणीपासून अन्य कामांसाठी काही कर्मचाऱ्यांना प्रत्येक कार्यालयातून घेण्यात आले होते. हे कर्मचारी काही महिन्यांपासून निवडणूक कार्यालयातच आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
शिक्षक शाळांमध्ये झाले रुजू
विधानसभा निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच २१ नोव्हेंबरला निवडणुकीच्या ड्युटीवर असलेल्या शिक्षकांना आणि निवडणूक केंद्र असलेल्या शाळांना मुख्याध्यापकांच्या अधिकारांमध्ये सुट्या देण्यात आल्या. निवडणुकीनिमित्त मतदारांच्या विभागानुसार शाळांमधील बेंच आणि वर्ग यांची व्यवस्था करण्यात आली होती. २२ नोव्हेंबरपासून सर्व शिक्षक हजर झाले आणि नियमित शाळा सुरू झाल्या आहेत.