मुंबई : म्हाडामधील ५६५ रिक्त पदे भरण्याकरिता राबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियेअंतर्गत स्पर्धात्मक परीक्षेकरिता ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी २१ ऑक्टोबर रात्री २३.५९ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. परीक्षा शुल्क भरण्याची मुदत २२ ऑक्टोबर रोजी रात्री २३.५९ वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती म्हाडाचे सचिव राजकुमार सागर यांनी दिली. १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ पासून विहित अर्हता धारण केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा म्हाडाच्या संकेतस्थळावर आहे. भरतीप्रक्रिया विविध ५६५ रिक्त पदांसाठी राबविण्यात येत असून, त्यामध्ये कार्यकारी अभियंता (स्थापत्य) १३ पदे, उपअभियंता (स्थापत्य) १३ पदे, मिळकत व्यवस्थापक / प्रशासकीय अधिकारी २ पदे, सहायक अभियंता (स्थापत्य) ३० पदे, सहाय्यक विधी सल्लागार २ पदे, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ११९ पदे, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक ६ पदे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ४४ पदे, सहाय्यक १८ पदे, वरिष्ठ लिपिक ७३ पदे, कनिष्ठ लिपिक टंकलेखक २०७ पदे, लघुटंकलेखक २० पदे, भूमापक ११ पदे, अनुरेखकाच्या ७ पदांचा समावेश आहे.
उमेदवारांना आवाहन -रिक्त पदांचा तपशील प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर आहे. म्हाडा प्रशासनाने भरतीप्रक्रियेसाठी कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व एजंट म्हणून नेमलेले नाही. -भरतीप्रक्रियेबाबत कोणत्याही अनधिकृत व्यक्तींशी कोणतेही आर्थिक व्यवहार करू नये तसेच त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, असेही आवाहन केेले आहे.