म्हाडा इमारत दुरुस्तीसाठी २५० कोटी रुपये देणार; गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 06:13 AM2022-03-16T06:13:46+5:302022-03-16T06:13:54+5:30

मुंबई आणि आसपासच्या संक्रमण शिबिरात मोठ्या प्रमाणात घुसखोरीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.

MHADA to provide Rs 250 crore for building repairs; Information of Home Minister Jitendra Awhad | म्हाडा इमारत दुरुस्तीसाठी २५० कोटी रुपये देणार; गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती

म्हाडा इमारत दुरुस्तीसाठी २५० कोटी रुपये देणार; गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती

Next

मुंबई : म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतींच्या दुरुस्ती व पुनर्बांधणी करण्याकरिता एकूण १०० कोटींचा निधी उपलब्ध आहे. हा निधी २०० ते २५० कोटींपर्यंत वाढविण्यासाठी लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.

मुंबई आणि आसपासच्या संक्रमण शिबिरात मोठ्या प्रमाणात घुसखोरीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. ही घुसखोरी बंद झाली पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू असून, चौकशी समिती गठित केली आहे. त्याचा अहवाल मिळाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे आव्हाड यांनी सांगितले. या संदर्भात काँग्रेसचे अमिन पटेल यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. भाजपचे अतुल भातखळकर चर्चेत सहभागी झाले. म्हाडातील विविध रिक्त पदांचा प्रश्न निकाली काढत ५२३ पदे भरती करण्यात आली असून, तीन महिन्यात या जागा भरल्या जातील, असेही त्यांनी जाहीर केले.

कामाठीपुरा पुनर्विकास; निर्णय लवकरच

कामाठीपुरा येथील पुनर्विकासाचा प्रश्न लवकरात लवकर मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर मांडण्यात  येईल, असे जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केले तर मुंबई शहर व उपनगरात ३८ ठिकाणी संक्रमण शिबिर असून, यात तब्बल २१,१४९ संक्रमण गाळे आहेत. मुंबई मंडळामार्फत बोरिवली, गोरेगाव, मुलुंड, विक्रोळी, कांदिवली, कुलाबा, सायन, कफ परेड अशा विविध ठिकाणी संक्रमण शिबिर पुनर्विकास योजना पूर्ण केल्या आहेत. मंडळास ५,६३९ संक्रमण शिबिर गाळे उपलब्ध झालेले असून, ते सुस्थितीत आहेत, असे आव्हाड म्हणाले.

Web Title: MHADA to provide Rs 250 crore for building repairs; Information of Home Minister Jitendra Awhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.