‘म्हाडाची अभिहस्तांतरण प्रक्रिया होणार वेगवान’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 05:38 AM2018-08-29T05:38:26+5:302018-08-29T05:38:54+5:30
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडाचा घटक) अखत्यारीतील मुंबईमधील ५६ वसाहतींतील गाळेधारकांच्या अभिहस्तांतरण प्रक्रियेस गती येण्याकरिता म्हाडातर्फे नवीन धोरण जाहीर करण्यात आले आहे.
मुंबई : मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडाचा घटक) अखत्यारीतील मुंबईमधील ५६ वसाहतींतील गाळेधारकांच्या अभिहस्तांतरण प्रक्रियेस गती येण्याकरिता म्हाडातर्फे नवीन धोरण जाहीर करण्यात आले आहे. यानुसार इमारतीच्या मालकीचे सहकारी संस्थेकडे हस्तांतरण करतेवेळी संस्थेकडे १९९८ पूर्वीच्या सेवाआकाराच्या दराची रक्कम दंडासह व सुधारित सेवा आकाराच्या दरातील मूळ रक्कम वसूल करावी. तसेच सुधारित सेवा आकारावरील व्याजाची रक्कम एक वर्षात म्हाडाकडे भरण्याबाबत संस्थांकडून बंधपत्र घेऊन ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करवून घेऊन अभिहस्तांतरण करता येईल, अशी माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांनी जाहीर केलेल्या सुधारित परिपत्रकाद्वारे दिली आहे.
मिळकत व्यवस्थापक विनियम २१मधील तरतुदीनुसार अभिहस्तांतरण झाल्यानंतर सेवा आकार व इतर देय रकमासंबंधित संस्थेकडे, जसे मुंबई महानगरपालिका, विद्युत मंडळाकडे परस्पर भरण्याची जबाबदारी संस्थेची राहील. तसेच अनधिकृत बांधकामांच्या अभिहस्तांतरणाबाबत म्हाडाच्या मूळ नकाशात दर्शविलेले क्षेत्रफळ ग्राह्य धरून अभिहस्तांतरण करता येईल व वाढीव बांधकामाबाबत स्वतंत्ररीत्या कारवाई करण्यात येईल, असा निर्णय या परिपत्रकाद्वारे घेण्यात आला आहे.
अभिहस्तांतरण हे संस्थेच्या नावाने करावयाचे असते. त्यामुळे म्हाडाचे मूळ गाळेधारक आणि म्हाडाकडून रीतसर परवानगी घेतलेले गाळेधारक यांच्या यादीनुसार संस्थेबरोबर अभिहस्तांतरण करण्यात येईल व संबंधित गृहनिर्माण संस्थेकडून त्या गाळेधारकाच्या हस्तांतरणास, अभिहस्तांतरण झाल्यानंतर विहित कार्यपद्धतीनुसार कागदपत्रांची पूर्तता व हस्तांतरण शुल्क भरून म्हाडाकडून परवानगी घेण्यात येईल, असे प्रतिज्ञापत्र घेऊनच त्या गृहनिर्माण संस्थेचे अभिहस्तांतरण करण्यात येईल, अशी तरतूद या परिपत्रकात केली आहे.
काम होईल सोपे
च्या नवीन धोरणामुळे गाळेधारक व सहकारी गृहनिर्माण संस्थांना अभिहस्तांतरण करतेवेळी येणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होईल व ही कार्यपद्धत अधिक सोपी, सुलभ, गतिमान होऊन अभिहस्तांतरणाला निश्चितच वेग मिळेल.
च्५६ वसाहतीतील ३ हजार ७०१ इमारतीत एक लाख ११ हजार ६५९ सदनिकांपैकी १ हजार ९६४ इमारतीतील ६६ हजार ४९८ गाळेधारकांचे अभिहस्तांतरण व्हायचे आहे.