- अजय परचुरे
मुंबई : म्हाडाच्या अध्यक्षपदी शिवसेना आमदार उदय सामंत यांची वर्णी लागली आणि त्यांनी शिवसेनेचे गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या केबिनचा ताबा घेत कामांना सुरुवात केली. त्यामुळे म्हाडा अध्यक्ष नव्हते तोपर्यंत याच केबिनमधील खुर्चीवर बसून कारभार हाकणाऱ्या वायकर यांचे म्हाडातील महत्त्व कमी झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे. यामुळे शिवसेनेच्या या दोन महत्त्वाच्या नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे.म्हाडाचे अध्यक्षपद अनेक वर्षे रिक्त होते. २०१४ मध्ये रवींद्र वायकर यांनी गृहनिर्माण राज्यमंत्री पदाची सूत्रे घेतल्यानंतर वांद्रेतील म्हाडाच्या मुख्यालयातील ५ व्या मजल्यावर त्यांना केबिन मिळाली. येथूनच वायकर महत्त्वपूर्र्ण बैठका घेत असत. पण म्हाडा अध्यक्षपद उदय सामंत यांच्याकडे आल्यानंतर ही केबिन सामंत यांना मिळाली. तसेच वायकरांची पाटीही केबिनबाहेरून हटविण्यात आली. इतकी वर्षे अध्यक्ष नसल्याने गृहनिर्माण राज्यमंत्री वायकर यांनी म्हाडा संदर्भातले काही महत्त्वाचे निर्णय याआधी घेतले होते. अनेक गोष्टींत त्यांचा सहभागही होता. मात्र उदय सामंत यांच्या येण्याने वायकर यांची केबिन गेली. म्हाडातील महत्त्वही कमी झाले. त्यातच त्यांना म्हाडाच्या मुख्यालयात स्वतंत्र कक्ष नव्याने उपलब्ध करून देण्यात आलेला नाही.यासंदर्भात म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, हा कक्षच मुळात म्हाडाच्या अध्यक्षांसाठी आहे. वायकर यांच्या संमतीनेच मी या केबिनमध्ये बसतोय; शिवाय मी करीत असलेल्या कामांवर वायकर खूश असल्याने आमच्यात कोणताही राजकीय वाद नाही, असेही सामंत यांनी सांगितले.
बेघर झाल्याची चर्चासामंत यांनी सारवासारव केली असली तरी त्यांच्या येण्यामुळे इतकी वर्षे म्हाडात दिमाखाने येणारे वायकर सध्या म्हाडातून बेघर झाल्याची तसेच यामुळे दोघांत शीतयुद्ध रंगल्याची चर्चा सध्या म्हाडा मुख्यालयात दबक्या आवाजात सुरू आहे.