मुंबई : सुमारे 6 महिन्यांपूर्वी मुंबईतील घरांच्या सोडतीबाबत म्हाडाला आता जाग आली आहे. विविध ठिकाणच्या 814 सदनिका विजेत्यांना ताब्यात देण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली सोडतीनंतरची प्रक्रिया राबविणारे ‘लॉटरी पश्चात सॉप्टवेअर’ येत्या 22 डिसेंबरपासून कार्यान्वित करण्यात येणार आहे. अर्जाची छाननी व पात्रतेबाबत त्यांच्याशी व्यवहार राबविण्यात येणार असून, http://स्र23’33ी18.ेँंि.ॅ5.्रल्ल या संकेतस्थळावर ‘लॉग इन’ करून त्याबाबतची यादी व कागदपत्रच्या प्रती घ्यावयाच्या आहेत.
सहा महिन्यांपासून रेंगाळलेल्या या प्रक्रियेबाबत नागरिकांतून व्यक्त होत असलेली नाराजी ‘लोकमत’ने प्रखरपणो मांडली होती. त्यानंतर जागे झालेल्या प्रशासनाने आता पोस्ट लॉटरी सॉप्टवेअर कार्यान्वित करण्याचे ठरविले आहे. गरजू नागरिक म्हाडाच्या या वर्षीच्या लॉटरीकडे आस लावून बसले होते. 25 जूनला मुंबई व कोकण विभागातील 2641 घरांसाठी लॉटरी काढण्यात आली. मात्र या घरांचे काम अपूर्णावस्थेत असल्याने म्हाडाने त्यानंतरची प्रक्रिया संथगतीने घेण्याचे ठरविले होते. गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत मुंबई मंडळाने केवळ विजेत्यांना अभिनंदनाचे पत्र पाठविण्याची औपचारिकता दाखविली होती तर कोकण मंडळाने तितकेही औचित्य दाखविलेले नाही. त्यांच्या विरार व बोळीज येथील 1827 घरांचे काम अद्याप अर्धवट असल्याने त्याबाबत विजेत्यांच्या अर्जाच्या छाननीची प्रक्रिया पुढील वर्षाच्या मार्चपासून करण्याचे जाहीर केले आहे. (प्रतिनिधी)