पडीक भूखंडावर म्हाडा लॉटरीसाठीची घरे बांधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:08 AM2021-07-14T04:08:58+5:302021-07-14T04:08:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : जागतिक बँकेच्या प्रकल्पात म्हाडाकडून काही संस्थांना भूखंड देण्यात आले होते. यातील बहुतेक भूखंड हे ...

MHADA will build lottery houses on the waste land | पडीक भूखंडावर म्हाडा लॉटरीसाठीची घरे बांधणार

पडीक भूखंडावर म्हाडा लॉटरीसाठीची घरे बांधणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : जागतिक बँकेच्या प्रकल्पात म्हाडाकडून काही संस्थांना भूखंड देण्यात आले होते. यातील बहुतेक भूखंड हे शासनच्या, संस्थांच्या ताब्यात आहेत. मात्र हे भूखंड असेच पडून आहेत. येथे अतिक्रमण होण्यासह इतर अनेक समस्या निर्माण झाल्याच्या तक्रारी येत आहेत. आता या प्रकरणात संबंधित संस्थांना नोटीस देत म्हाडा हे भूखंड आपल्या ताब्यात घेणार आहे. किमान शंभरएक भूखंड असे असून, हे भूखंड बंगलो, घरे बांधण्यासाठी होते. आता हे भूखंड ताब्यात घेण्यात आल्यावर भविष्यात म्हाडाकडून यावर बांधण्यात येणारी घरे लॉटरीसाठी वापरण्यात येणार आहेत.

म्हाडाच्या वांद्रे येथील मुख्यालयात मंगळवारी महापौर किशोरी पेडणेकर, खासदार, आमदार आणि नगरसेवक यांची संयुक्त बैठक झाली. यावेळी महापालिकेच्या विविध विभागाचे मुख्य अभियंता उपस्थित होते. या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून, उर्वरित अनेक नागरी सेवा- सुविधांशी संबंधित निर्णय घेण्यात आले आहेत, अशी माहिती मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

म्हाडा नियोजन प्राधिकरण झाल्यानंतर म्हाडामध्ये आम्ही नागरी सुविधा पुरविणार नाही, अशी भूमिका महापालिकेने यापूर्वी घेतली होती. लोकप्रतिनिधींनी याबाबत प्रश्न मांडला होता. नागरी सुविधा नक्की कोणाची जबाबदारी, असा प्रस्ताव नगर विकास विभागाला गेला. नगर विकास विभागाने यावर निर्देश दिले की या सुविधा महापालिकेने द्यायच्या आहेत. मात्र महापालिका आदेश अमलात आणत नव्हती. परिणामी नागरी सेवा सुविधांचा खोळंबा होत होता. मात्र आता पाणी, रस्ते आणि जलवाहिन्यांचा खर्च महापालिका करणार आहे, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

तीस वर्षांपूर्वी जेथे कॉलनी झाल्या तेथे नागरी सुविधा म्हाडाकडे हस्तांतरित झाल्या. आता नागरी सुविधा कामे करायची असतील तर महापालिकेच्या ताब्यात ते नसल्याने त्यांना ती कामे करता येत नाहीत. परिणामी अशा सुविधांबाबत महापालिकेने काही प्रश्न उपस्थित केले तर रस्ते अथवा जलवाहिन्या महापालिकेकडे हस्तांतरित केल्या जातील, असाही निर्णय यावेळी घेण्यात आला. म्हाडा आता थकीत जल देयके भरणार आहे. जेणेकरून कोणीही पाण्यापासून वंचित राहणार नाही, असेदेखील विनोद घोसाळकर यांनी सांगितले.

Web Title: MHADA will build lottery houses on the waste land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.