म्हाडा काढणार घरांची बंपर लॉटरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:06 AM2021-02-13T04:06:12+5:302021-02-13T04:06:12+5:30
कोकण मंडळाची ७,५००, तर मुंबईतील ४ हजार घरे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : परवडणाऱ्या घरांची लॉटरी काढण्यात आघाडीवर असलेले ...
कोकण मंडळाची ७,५००, तर मुंबईतील ४ हजार घरे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : परवडणाऱ्या घरांची लॉटरी काढण्यात आघाडीवर असलेले म्हाडा प्राधिकरण आता ७ हजार ५०० घरांची लॉटरी काढणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून ही लॉटरी काढण्यात येईल. या लॉटरीतील घरे मुंबई महानगर प्रदेश येथे असणार आहेत, तर म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून चार हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार असून, यातील बहुतांश घरे गोरेगाव येथे आहेत.
कोकण मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे आणि कल्याण येथे लॉटरीची घरे असतील. मार्च महिन्याच्या अखेरीस या लॉटरी प्रक्रियेस सुरुवात होईल आणि मे महिन्याच्या शेवटी लॉटरीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. म्हाडा प्राधिकरण खासगी विकासकांच्या तुलनेत कमी भावाने घर देणारे प्राधिकरण म्हणून ओळखले जात असल्याने कोकण मंडळाच्या लॉटरीत अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी नेमकी किती घरी असतील याची सर्वांना उत्सुकता आहे.
कोकण मंडळाची लॉटरी निघणार असतानाच मुंबई मंडळाची लॉटरी कधी निघणार, या प्रश्नाचे उत्तर म्हाडाने अद्याप दिले नसले तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार म्हाडाकडून येत्या दिवाळीत मुंबईसाठी चार हजार घरांची लॉटरी काढली जाईल. यातील ३ हजार ५०० घरे गोरेगाव पहाडी या परिसरातील असतील.
..........................