पुनर्विकासातून म्हाडाला मिळणार ४२ हजार घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 01:26 AM2019-09-20T01:26:28+5:302019-09-20T01:26:32+5:30

मुंबईमधील घरांचा तुटवडा दूर करण्यासाठी आणि भविष्यातील मुंबईतील लॉटरीतील घरांची संख्या वाढविण्यासाठी म्हाडाने पावले उचलली आहेत.

Mhada will get 3,000 houses from redevelopment | पुनर्विकासातून म्हाडाला मिळणार ४२ हजार घरे

पुनर्विकासातून म्हाडाला मिळणार ४२ हजार घरे

Next

मुंबई : मुंबईमधील घरांचा तुटवडा दूर करण्यासाठी आणि भविष्यातील मुंबईतील लॉटरीतील घरांची संख्या वाढविण्यासाठी म्हाडाने पावले उचलली आहेत. गोरेगाव पश्चिम येथील मोतीलालनगर या १४२ एकरवर पसरलेल्या म्हाडाच्या वसाहतीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतल्याने या पुनर्विकासातून म्हाडाला ४० हजार घरे उपलब्ध होणार आहेत. यासह म्हाडाच्या जागेवरील दोन हजार झोपड्यांचा पुनर्विकास म्हाडा स्वत: करणार आहे. यातून म्हाडाला दोन हजार अतिरिक्त घरे विक्रीसाठी मिळणार आहेत. म्हणजेच इमारती आणि चाळींच्या पुनर्विकासातून ४० हजार आणि झोपड्यांच्या पुनर्विकासातून दोन हजार असा एकूण ४२ हजार घरांचा हाउसिंग स्टॉक (गृहसाठा) म्हाडाकडे उपलब्ध होणार आहे.
मोतीलालनगरमध्ये म्हाडाच्या जागेवर इमारती - चाळींसह काही झोपड्याही आहेत. विकास आराखड्यानुसार ३३(५) अंतर्गत या इमारती-चाळींचा पुनर्विकास होणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मोतीलालनगरातील रहिवाशांना जास्त चटईक्षेत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच ३३(१०) अंतर्गत झोपडपट्टीचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. यासाठी झोपडपट्टीवासीयांना एकत्र येऊन को-आॅपरेटिव्ह सोसायटी स्थापन करावी लागणार आहे. म्हाडाच्या जागेवर या झोपड्या असल्याने मालकी अधिकाराने या झोपड्या विकसित कराव्या लागणार आहेत.
परवडणारी घरे उपलब्ध व्हावीत म्हणून इथे अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटातील घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. तर दोन हजार झोपडीवासीयांना ३०० चौरस फुटांचे घर देण्यात येणार आहे. या दोन हजार झोपड्यांव्यतिरिक्त म्हाडाला दोन हजार घरांचा हाउसिंग स्टॉक मिळणार असल्याचे म्हाडाचे सभापती मधू चव्हाण यांनी सांगितले. तसेच खाजगी विकासकांना झोपडपट्टी विकसित करण्यास मनाई करण्यात येणार आहे, आवश्यकता वाटल्यास विशेषाधिकार वापरत विकासकाला मोतीलालनगरमधील झोपडपट्टी विकसित करण्यास मनाई करण्यात येईल, असेही चव्हाण या वेळी म्हणाले. यासह अध्यादेश काढून पुनर्विकासास विरोध करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही ते या वेळी म्हणाले.
म्हाडाने १४२ एकरच्या जागेवर पुनर्विकासातून मिनी शहर उभारण्याची योजना आखली आहे. यासाठी म्हाडाने प्रकल्प सल्लागार म्हणून पी. के. दास या कन्सल्टन्ट कंपनीची निवड केली असून प्रत्यक्षात सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. याचा दर १५ दिवसांनी आढावा घेतला जात आहे. नोव्हेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
प्रकल्पातील सोई-सुविधा कशा असतील याची माहिती या ठिकाणी म्हाडामार्फत होर्डिग्ज लावून रहिवाशांना देण्यात येणार असल्याचे चव्हाण या वेळी म्हणाले.
>मिनी थिएटर, वृद्धाश्रमही असणार
रहिवाशांना आधुनिक सुविधांसोबतच मैदाने, रुग्णालय, मिनी थिएटर, वृद्धाश्रम अशाही सुविधा या प्रकल्पात उपलब्ध केल्या जाणार आहेत. या पुनर्विकास प्रक्रियेला प्रत्यक्षात सुरुवात होण्यापूर्वी सर्व रहिवाशांना संपूर्ण प्रकल्प नेमका कसा असेल याविषयीचे सादरीकरण दाखविले जाणार आहे. सर्व रहिवाशांच्या पुनर्विकासासाठी अंदाजे ३० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

Web Title: Mhada will get 3,000 houses from redevelopment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.