मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पातील सेक्टर-५मध्ये म्हाडामार्फत सुरू असलेल्या इमारतींच्या कामाला पुन्हा शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. लवकरच या इमारतींचे बांधकाम पूर्ण होऊन म्हाडाला ६७२ घरे मिळणार असल्याची माहिती मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांनी दिली.राज्य सरकारने २००४ मध्ये धारावीच्या पुनर्विकासासाठी धारावी पुनर्विकास प्राधिकरणाची (डीआरपी) स्थापना केली. डीआरपीने धारावीचा पुनर्विकास पाच सेक्टरमध्ये करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सेक्टर-५चे काम म्हाडाकडे २१ मे २०११ रोजी सोपवण्यात आले. म्हाडाने ही जबाबदारी चोखपणे पार पाडत ३०० चौरस फूट चटई क्षेत्र असलेल्या ३५८ सदनिकांचे काम पूर्ण करून त्याचे वितरण रहिवाशांना केले.सध्या म्हाडाकडून येथे ३५० चौरस फूट चटई क्षेत्राच्या ६८२ सदनिका असलेल्या क्रमांक ४ आणि ५ या इमारतींच्या १४ मजल्यांपर्यंतचे काम प्रगतीपथावर आहे. आणखी ६७२ सदनिका असलेल्या इमारत क्रमांक २ आणि ३ ला आॅक्टोबर २०१७ मध्ये सीसी मिळाली आहे.एकूण १ हजार ३५९ सदनिका अठरा महिन्यांमध्ये पूर्णत्वावर असताना डीआरपीने संपूर्ण धारावीचा एकत्रित पुनर्विकास करण्याचा जीआर नोव्हेंबर २०१८ मध्ये प्रसिद्ध केला. यामुळे म्हाडाचे नुकसान होणार असल्याने म्हाडामार्फत सुरू असलेल्या इमारतींची कामे पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यासाठी डीआरपीला निर्देश द्यावेत, अशी मागणी त्याच वेळी मधू चव्हाण यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.ठप्प असलेल्या कामांना पुन्हा सुरुवातसेक्टर ५चे काम यामुळे पुन्हा प्रलंबित राहणार असल्याने यामुळे पुढील दोन वर्षांत पुनवर्सनासाठी तयार होऊ शकणाऱ्या एकूण १ हजार ३३२ सदनिका अर्धवट स्थितीत राहणार असून, त्याचा धारावी प्रकल्पग्रस्तांना लाभ होऊ शकणार नाही आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे या पत्रामध्ये नमूद करण्यात आले होते. या पत्राची दखल घेत महाआघाडी सरकारने म्हाडाच्या ठप्प असलेल्या कामांना पुन्हा सुरुवात करण्यास मंजुरी दिली आहे. येत्या दीड वर्षामध्ये म्हाडाला ६७२ घरे मिळणार असून, ही घरे उपलब्ध होणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
धारावीच्या पुनर्विकासातून म्हाडाला मिळणार ६७२ घरे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 3:29 AM