मुंबई : धारावीच्या पुनर्विकासासाठी आवश्यक असलेली रेल्वेच्या मालकीची ४६ एकरची जागा खरेदीसाठी आठशे कोटींची गरज आहे. यासाठी म्हाडाकडून दोनशे कोटी, तर उर्वरित सहाशे कोटींपैकी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) आणि महाराष्ट्र निवारा निधी यांच्याकडून प्रत्येकी तीनेशे कोटी देण्याचे आदेश जारी केले आहेत. ही रक्कम धारावी पुनर्वसनासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या विशेष हेतू कंपनीने संबंधित आस्थापनांना परत करावयाची आहे.
धारावी प्रकल्पासाठी रेल्वेची जमीन मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची रेल्वे मंत्रालयासोबत बैठक झाली होती. या वेळी विशेष हेतू कंपनीच्या माध्यमातून जमीन देण्याची तयारी रेल्वे मंत्रालयाने दाखवली आहे. ही कंपनी स्थापन झाल्यावर सदरची रक्कम संबंधित प्राधिकरणांना परत करावी लागणार आहे. यासंदर्भात सरकारी आदेश जारी करण्यात आला आहे. यापूर्वी आठशे कोटी रुपये वळवण्याच्या निर्णयाबाबत म्हाडातील कर्मचारी संघटनांनी चिंता व्यक्त करत विरोध दर्शवला होता.
याविरोधात आंदोलनही करण्यात येणार होते. मात्र म्हाडावरील हा भार कमी करण्यात आला असून आता फक्त दोनशे कोटी रुपयेच वळवण्यात येणार आहेत. म्हाडाच्या तिजोरीमध्ये दोन हजार कोटी रुपये शिलकीत आहेत. यापैकी एक हजार कोटी आयकर विभागाच्या खात्यात जमा करावे लागणार आहेत.