चित्रपट, वृत्तपत्रातील पडद्यामागच्या लोकांना म्हाडा देणार हक्काचे घर; आव्हाड यांची माहिती

By अतुल कुलकर्णी | Published: May 5, 2022 06:05 AM2022-05-05T06:05:01+5:302022-05-05T06:05:27+5:30

लवकरच सर्वंकष धोरण आणले जाणार असल्याची आव्हाड यांची माहिती.

MHADA will give a rightful home to the people behind the scenes in movies and newspapers said jitendra awhad | चित्रपट, वृत्तपत्रातील पडद्यामागच्या लोकांना म्हाडा देणार हक्काचे घर; आव्हाड यांची माहिती

चित्रपट, वृत्तपत्रातील पडद्यामागच्या लोकांना म्हाडा देणार हक्काचे घर; आव्हाड यांची माहिती

googlenewsNext

अतुल कुलकर्णी
मुंबई : चित्रपट आणि वृत्तपत्र क्षेत्रात पडद्यामागे काम करणाऱ्यांना हक्काचे घर देण्याचा निर्णय ‘म्हाडा’ने घेतला आहे. त्यासाठी लवकरच सर्वंकष धोरण आणले जाईल, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

कोरोनानंतर चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात बॅक स्टेजवर काम करणारे लोक बेघर झाले. अनेकांना रोजगारावर पाणी सोडावे लागले. नाटक आणि चित्रपट ही दोन्ही क्षेत्र आता पुन्हा हळूहळू उभारी घेत आहेत. या क्षेत्रात पडद्याआड राहून काम करणारे अनेक लोक आहेत. त्यांना त्यांचे स्वतःचे घर नाही. अशीच परिस्थिती वृत्तपत्र आणि माध्यमांमध्ये काम करणाऱ्यांची आहे. माध्यमांमध्ये पत्रकारांच्या व्यतिरिक्त माध्यमात छपाई मशीनमध्ये काम करणारे लोक, डेस्कवर काम करणारे लोक यांची संख्या मोठी आहे. त्यात अनेकांना घर नाही. यासाठी म्हाडाच्यावतीने त्यांना घरे देण्यासाठी नियोजन केले जात आहे, असे आव्हाड यांनी सांगितले.

मुंबईमध्ये भूमाफिया मोठ्या प्रमाणावर जमिनी लाटण्याचे काम करतात. मुंबईत सगळ्यात मोठ्या जागेचा मालक म्हाडा आहे. ‘म्हाडा’ने आता त्यांच्याकडे असलेल्या जागा सुरक्षित करणे जास्त महत्त्वाचे बनले आहे. हे करत असताना नाटक, चित्रपट आणि माध्यमांमध्ये काम करणाऱ्या लोकांना परवडणाऱ्या दरात घरे देण्याचे नियोजन करण्याच्या सूचना आपण ‘म्हाडा’च्या अधिकाऱ्यांना दिल्याचे गृहनिर्माण मंत्री आव्हाड म्हणाले. ही घरे लकी ड्रॉ पद्धतीने दिली जातील. ‘म्हाडा’कडे असलेल्या जागा म्हाडाच विकसित करेल. अनेकदा बांधकाम व्यावसायिक त्या जागा घेऊन ठेवतात आणि पुढे त्याचा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करतात. हे यापुढे होऊ दिले जाणार नाही. कोणत्याही परिस्थितीत म्हाडाच्या जागेचा वापर बांधकाम व्यावसायिकांना स्वतःच्या भल्यासाठी करू दिला जाणार नाही. उलट या जागांवर मोठ्या प्रमाणावर घरांची निर्मिती करेल. 

स्वतःचे घर असेल तर त्यांना याचा लाभ मिळणार नाही. मात्र, आजही भाड्याच्या जागेत राहात असतील आणि स्वतःचे हक्काचे घर नसेल त्यांना योजनेच्या माध्यमातून घरे दिली जातील. त्यासाठीची पद्धत जाहीर केली जाईल, असे आव्हाड म्हणाले.

Web Title: MHADA will give a rightful home to the people behind the scenes in movies and newspapers said jitendra awhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.