म्हाडा थेट १० जूनला सोडविणार लोकांचे प्रश्न
By सचिन लुंगसे | Published: March 23, 2024 05:37 PM2024-03-23T17:37:24+5:302024-03-23T17:37:37+5:30
एप्रिल व मे महिन्यांमध्ये निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याने लोकशाही दिनाचे आयोजन १० जून रोजी केले जाईल.
मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे म्हाडातर्फे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी होणाऱ्या लोकशाही दिनाचे पुढील दोन महिन्यांकरिता आयोजन करण्यात येणार नाही. पुढील लोकशाही दिन १० जून रोजी आयोजित करण्यात येणार आहे. म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनातील चौथ्या मजल्यावर असलेल्या सभागृहात म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून म्हाडा लोकशाही दिन आयोजित करण्यात येत आहे.
एप्रिल व मे महिन्यांमध्ये निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याने लोकशाही दिनाचे आयोजन १० जून रोजी केले जाईल. ८ जानेवारी रोजी झालेल्या पहिल्या लोकशाही दिनानिमित्त प्राप्त १५ अर्ज व १३ फेब्रुवारी रोजी झालेल्या दुसऱ्या लोकशाही दिनाच्या निमित्ताने प्राप्त १६ अर्ज प्रकरणी अर्जदारांचे म्हणणे ऐकून घेत कार्यवाही करण्यात आली आहे. आजतागायत तिन्ही लोकशाही दिन मिळून ४१ अर्ज प्राप्त झाले असून ३२ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. ९ अर्ज प्रलंबित असून त्यापैकी ५ अर्ज इतर शासकीय आस्थापनांशी निगडित असल्याने त्यांच्याकडे कार्यवाहीसाठी हस्तांतरित करण्यात आले आहेत.