म्हाडा सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी सोडविणार
By सचिन लुंगसे | Published: February 1, 2024 05:55 PM2024-02-01T17:55:17+5:302024-02-01T17:56:12+5:30
म्हाडा लोकशाही दिन आयोजित करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी / अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून निराकरण व्हावे यासाठी नवीन वर्षापासून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली म्हाडा लोकशाही दिन आयोजित करण्यात येत आहे. त्यानुसार, आता १३ फेब्रुवारी रोजी म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनातील चौथ्या मजल्यावरील सभागृहात दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
म्हाडा लोकशाही दिनासाठी अर्ज विहित नमुन्यात असणे आवश्यक असून त्याचे प्रपत्र १ अ ते प्रपत्र ड हे नमुने म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्यानुसार अर्जदाराची तक्रार / निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असावे. तसेच अर्जदाराने अर्ज १४ दिवस अगोदर दोन प्रतींत पाठवणे आवश्यक आहे. नागरिकांना तात्काळ निर्णय देणे सुलभ व्हावे याकरिता विषयाशी निगडित संबंधित विभाग / मंडळ प्रमुख यावेळी हजर राहणार आहेत. तसेच प्राप्त झालेल्या अर्जाची पोच पावती दिली जाणार आहे. दरम्यान, ८ जानेवारी रोजी झालेल्या पहिल्या लोकशाही दिनामध्ये १५ अर्ज प्राप्त झाले होते. या सर्व अर्जदारांचे म्हणणे ऐकून घेत संबंधित अर्जदारांच्या अर्जाबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश संजीव जयस्वाल यांनी संबंधित अधिकार्यांना दिले आहेत.