मुंबई : ना. म. जोशी मार्ग, नायगाव आणि वरळी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची जबाबदारी राज्य शासनाने म्हाडावर सोपवली आहे. यानुसार म्हाडाने येथील सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे. रहिवाशांना संक्रमण शिबिरांत स्थलांतर करण्यासाठी करारही करण्यात येत आहेत; मात्र येथील ५८ जणांनी यास विरोध दर्शवित स्थलांतर करण्यास विरोध केला आहे. या रहिवाशांना नोटीस देऊन कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हाडा मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांनी मंगळवारी म्हाडामध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.ना. म. जोशी मार्ग, नायगाव आणि वरळी येथील बीडीडी चाळींमध्ये सुमारे १५ हजार ५९३ रहिवासी वास्तव्यास आहेत. या तिन्ही जागांच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत विक्रीसाठी एकूण ८ हजार १२० गाळे मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील घरे तयार होणार असल्याचे चव्हाण यांनी या वेळी सांगितले. येथील पुनर्विकास प्रक्रियेस सुरुवात झाली असून सध्या गाळ्यांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या ठिकाणी एकूण २ हजार ४८० घरे असून पहिल्या टप्प्यात यातील आठशे घरांची पात्रता निश्चिती करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये ४५१ घरांची पात्रता पूर्ण झाली आहे. पात्र ठरलेल्यांना संक्रमण शिबिरामध्ये स्थलांतर करण्यासाठी करार करण्यात येत आहेत, मात्र या कराराला ५८ जणांनी विरोध दर्शवत स्थलांतर करण्यास विरोध केला. त्यांच्यावर म्हाडा कायदा ९५ (अ) नुसार नोटीस देऊन कारवाई करणार असल्याचे चव्हाण यांनी या वेळी सांगितले.टप्प्याटप्प्याने होणार स्थलांतरना. म. जोशी मार्ग येथे २ हजार ४५६ निवासी तर २४ अनिवासी गाळे आहेत. या रहिवाशांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर करण्यात येणार आहे. या ठिकाणी ७२८ मध्यम तर ५४० उच्च उत्पन्न गटातील घरे बांधण्यात येणार आहेत. तसेच २६ हजार ६३६ व्यापारी क्षेत्र उपलब्ध होणार आहे. पुनर्वसन इमारत २३ मजल्यांपर्यंत आणि विक्री योग्य इमारत ४० मजल्यांपर्यंत प्रस्तावित असल्याचे चव्हाण या वेळी म्हणाले.
‘त्या’ ५८ जणांवर म्हाडा करणार कारवाई, संक्रमण शिबिरात जाण्यास दिला नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2019 3:01 AM