मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पाचा प्रश्न शासनाने सोडवला आहे. या प्रकल्पाची निविदा प्रकाशित करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे ३३ हजार परवडणारी घरे उपलब्ध होणार असून, सर्वसामान्यांचे हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.म्हाडा याच धर्तीवर टागोर नगर, कन्नमवार नगरमधील फक्त एका इमारतीला पुनर्विकासासाठी मान्यता न देता सर्व इमारतींच्या पुनर्विकासाचा एकत्रित आराखडा तयार करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे वसाहतींचे सुटसुटीत नियोजन करून पायाभूत सुविधांवरील ताण कमी करता येणार आहे.मुंबई शहराच्या सीमित भौगोलिक कक्षा व घरांची वाढती मागणी या बाबींचा विचार करता म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या अखत्यारितील ५६ पैकी काही वसाहतींचा समूह पुनर्विकास करून सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात घरे देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. कोकण मंडळाच्या ८९८४ सदनिकांसाठी २ लाख ४६ हजार ६५० विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. यावरून सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांची निकड पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.कोविड साथरोग व त्या पार्श्वभूमीवर लागू टाळेबंदीमुळे हक्काचे घर असावे ही संकल्पना नागरिकांमध्ये वाढत आहे. त्यामुळे कमीत कमी कालावधीत परवडणाऱ्या दरात गृहनिर्मिती करण्याचे आव्हान म्हाडासमोर आहे. म्हाडा हे आव्हान नक्की स्वीकारेल व सक्षमतेने पेलेल. - जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री गाव तिथे म्हाडा ही संकल्पना म्हाडा राबविणार आहे.तळीये (जि. रायगड) गावातील ग्रामस्थांसाठी ६०० चौरस फुटाची २६१ घरे म्हाडा उभारणार आहे.मुंबईवरील ताण कमी करण्यासाठी ठाणे जिल्ह्यात शासनाने म्हाडाला जमीन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.ठाण्यातील वर्तक नगर येथे लवकरच १२०० घरांची उभारणी म्हाडातर्फे केली जाणार आहे. यातील ४०० घरे पोलिसांना दिली जातील.
मुंबईत म्हाडाची 33 हजार परवडणारी घरे; सर्वसामान्यांचे स्वप्न होणार पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 7:40 AM