मुंबई - सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न साकार करणाऱ्या म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५ हजार ३११ घरांच्या लॉटरीसाठी प्राधिकरणाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. महत्त्वाचे म्हणजे नोव्हेंबर महिन्यात कोकण मंडळाच्या घरांची लॉटरी काढण्यात येणार होती. मात्र, मुदतवाढ मिळाल्यानंतर वर्षाअखेर घरांची लॉटरी काढली जाईल, असे म्हाडाकडून सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात आता साडेतीन महिने उलटूनदेखील कोकण मंडळाच्या लॉटरीला मुहूर्त मिळालेला नाही.
१५ सप्टेंबर रोजी म्हाडाच्या कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या ५,३११ सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाइन संगणकीय सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेच्या गो लाइव्ह कार्यक्रमाचा शुभारंभ म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आला.
कोंकण मंडळाच्या सोडतीमध्ये १ हजार १० सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेतील आहेत. एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत १,०३७ सदनिका,योजनेअंतर्गत ९१९ सदनिका, टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन यांच्यासाठी ६७ सदनिका तर कोंकण मंडळाच्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत विखुरलेल्या २,२७८ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
म्हाडा मुख्यालयात रंगल्या अशा चर्चा सूत्रांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावावी म्हणून प्रयत्न केले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने लॉटरीचा कार्यक्रम लांबला आहे. राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत लॉटरी काढली नाही, तर त्याचे परिणाम काय असू शकतात? किंवा काय होऊ शकतात? याची चर्चा आता म्हाडा मुख्यालयात रंगू लागली आहे. त्यामुळे किमान प्रोटोकॉल म्हणून तरी या प्रक्रियेवर भर दिला जात आहे. तारीख निश्चित नाहीप्रशासकीय कारणात्सव १३ डिसेंबर रोजीची लॉटरी पुढे ढकलण्याचा निर्णय म्हाडाने घेतला होता. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात लॉटरी काढली जाईल, असेही म्हाडाने म्हटले. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी घरांच्या लॉटरीची तारीख निश्चितच झाली नसल्याचे सांगितले.