मुंबई : गोरेगावमधील पहाडी भागात असलेल्या भूखंडावर म्हाडा सर्वसामान्यांसाठी तब्बल ७,५०० घरे उभारणार आहे. म्हाडाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण होणार आहे.७,५०० घरांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठीची निविदा प्रकिया नुकतीच पूर्ण झाली. यामध्ये एल अँड टी आणि बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनी या दोनच कंपन्यांमध्ये स्पर्धा होऊन, अखेर ७ हजार ५०० घरे बांधण्याचे कंत्राट बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाले आहे.गोरेगाव पश्चिममधील पहाडी भागातील इनआॅर्बिट मॉलजवळ म्हाडाच्या मालकीचा १५ एकरचा भूखंड आहे. २०१५ साली हा भूखंड म्हाडाच्या ताब्यात आला. भूखंडाचा ताबा मिळाल्यावर म्हाडाने येथे गृहप्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी किमान ६ हजार घरांचा प्रकल्प उभारण्याची योजना म्हाडाने आखली होती. मात्र, नंतर यात १,५०० घरांची वाढ करण्यात आली. यासाठी पात्र कंपन्यांकडून निविदा मागविण्यात आल्या. म्हाडाने या निविदा प्रक्रियेची निविदापूर्व बैठक गेल्या वर्षी ३० डिसेंबरला बोलावली होती. त्याला एल अँड टी, टाटा, शापूरजी पालनजी, सिप्लेकस, बी. जी. शिर्के आदी १० बड्या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते, परंतु निविदेतील अटी-शर्तींमध्ये त्रुटी असल्याने यातील ८ कंपन्यांनी निविदा प्रकियेतून माघार घेतली. त्यामुळे फक्त एल अँड टी आणि बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनीने निविदेला प्रतिसाद दिला. शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनीचा बांधकाम दर एल अँड टीच्या तुलनेत कमी असल्यामुळे त्यांना कंत्राट त्यांना मिळाले. गेल्या २८ वर्षांपासून पडून असलेल्या या भूखंडावर आता या कमी दरामुळे अल्प उत्पन्न गटासाठी अंदाजे १३ लाखांत ३०० चौरस फुटांचे घर मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.कंत्राट बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनीलाम्हाडाचा निविदेतील बांधकाम दर हा २६ हजार ६०० चौरस मीटर होता, तर एल अँड टीचा दर हा २८ हजार १७८ चौरस मीटर असा होता आणि शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनीने २५ हजार ७०० चौरस मीटर हा दर दिला. त्यामुळे अखेर बी. जी. शिर्के कंस्ट्रक्शन कंपनीला कंत्राट मिळाले.
गोरेगावात म्हाडाची ७,५०० घरे; प्रकल्प २०२२ पर्यंत होणार पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2018 12:37 AM