पुनर्विकास प्रकल्पांसाठी म्हाडा उत्तम पर्याय - मुख्य अधिकारी सुमंत भांगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 06:25 AM2018-01-11T06:25:00+5:302018-01-11T06:25:09+5:30
पंतप्रधान अनुदान प्रकल्पांतर्गत (पीएमजीपी) मुंबईत बांधण्यात आलेल्या इमारतींच्या तत्काळ व पारदर्शक पुनर्विकासासाठी खासगी विकासकांच्या तुलनेत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) हा उत्तम व सक्षम पर्याय असल्याचा दावा मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी सुमंत भांगे यांनी केला आहे.
मुंबई : पंतप्रधान अनुदान प्रकल्पांतर्गत (पीएमजीपी) मुंबईत बांधण्यात आलेल्या इमारतींच्या तत्काळ व पारदर्शक पुनर्विकासासाठी खासगी विकासकांच्या तुलनेत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) हा उत्तम व सक्षम पर्याय असल्याचा दावा मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी सुमंत भांगे यांनी केला आहे. मुंबईतील ६६ इमारतींच्या पुनर्विकासासंदर्भात अखिल मुंबई राजीव गांधी निवारा प्रकल्प मध्यवर्ती सहकारी गृहनिर्माण संघटनेच्या शिष्टमंडळासोबत आयोजित बैठकीत भांगे बोलत होते.
वांद्रे पूर्वेकडील म्हाडाच्या गृहनिर्माण भवन मुख्यालयात संघटनेच्या नेतृत्वाखाली रहिवाशांच्या शिष्टमंडळाने भांगेंसोबत चर्चा केली. या वेळी ६६ इमारतींतील रहिवाशांच्या प्रतिनिधींबरोबर मंडळाचे अधिकारी, अभियंते उपस्थित होते. या वेळी भांगे म्हणाले की, येत्या ४ वर्षांत या इमारतींची पुनर्रचना पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. म्हाडाकडे मुंबईमध्ये मोठ्या संख्येने संक्रमण शिबिरे उपलब्ध आहेत. त्यामुळे रहिवाशांना पुनर्विकास प्रकल्प राबविताना तात्पुरत्या निवाºयाची सोय सहज होऊ शकते. इमारतीतील रहिवासी व म्हाडा यांच्यात योग्य समन्वय असणे आवश्यक आहे. सकारात्मक दृष्टीकोनातून हा प्रकल्प राबविला गेला पाहिजे. मुंबईत १९८८ ते १९९४ या कालावधीत पंतप्रधान अनुदान प्रकल्पाअंतर्गत बांधलेल्या ६६ इमारती जीर्ण व धोकादायक झाल्या आहेत. त्यांची पुनर्रचना विकास नियंत्रण नियमावली ३३(७) किंवा ३३ (९) अंतर्गत करणे क्रमप्राप्त आहे. २० इमारतींची लगतच्या पुनर्रचित/ उपकरप्राप्त/भूसंपादित इमारतीसह विकास नियंत्रण नियमावली ३३ (९) अंतर्गत सहा समूह पुनर्विकास योजना राबविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याची कार्यवाही सुरू आहे, असेही भांगे यांनी स्पष्ट केले.