म्हाडाची बंपर लॉटरी तब्बल ११५०० घरांची
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 03:36 AM2021-02-13T03:36:21+5:302021-02-13T03:36:39+5:30
‘कोकण’ची ७५००, तर मुंबईत ४ हजार घरे
मुंबई : म्हाडा लवकरच साडेअकरा हजार घरांसाठीची लॉटरी काढणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून ७ हजार ५०० घरांची लॉटरी काढली जाणार आहे. या लॉटरीतील घरे मुंबई महानगर प्रदेश येथे असणार आहेत, तर म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून चार हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार असून, यातील बहुतांश घरे गोरेगाव येथे आहेत.
कोकण मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे आणि कल्याण येथे लॉटरीची ही घरे असतील. मार्च महिन्याच्या अखेरीस या लॉटरी प्रक्रियेस सुरुवात होईल आणि मे महिन्याच्या शेवटी लॉटरीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. म्हाडा प्राधिकरण खासगी विकासकांच्या तुलनेत कमी भावाने घर देणारे प्राधिकरण म्हणून ओळखले जात असल्याने कोकण मंडळाच्या लॉटरीत अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी नेमकी किती घरी असतील याची सर्वांना उत्सुकता आहे.
म्हाडाची कोकण मंडळाची लॉटरी निघणार असतानाच मुंबई मंडळाची लॉटरी कधी निघणार, या प्रश्नाचे उत्तर म्हाडाने अद्याप दिले नसले तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार म्हाडाकडून येत्या दिवाळीत मुंबईसाठी चार हजार घरांची लॉटरी काढली जाईल. यातील सर्वाधिक ३ हजार ५०० घरे गोरेगाव पहाडी या परिसरातील असतील.