Join us

डोंगरीत म्हाडाची सेस इमारत कोसळली; ६ जणांची सुखरुप सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2020 11:35 AM

पडझडीच्या घटनांचे सत्र सुरुच

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पडझडीच्या घटनांचे सत्र सुरुच असून, बुधवारी सकाळी साडेसात वाजता डोंगरी येथील भारत पेट्रोल पंपासमोरील तळमजला अधिक चार मजली रझाक चेंबर इमारतीचा मागील संपुर्ण भाग कोसळल्याची घटना घडली. येथील घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगा-याखाली अडकलेल्या सहा जणांना सुखरुप बाहेर काढले, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाने दिली. दुपारपर्यंत येथील मदतकार्य सुरु होते. यासाठी चार फायर इंजिन, एक जेसीबी, एक रेस्क्यू व्हॅन आणि रुग्णवाहिका घटनास्थळी तैनात करण्यात आल्या होत्या. 

दरम्यान, यापूर्वी फोर्ट येथे भानुशाली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सर्वांना आपले घर तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. आता महिनाभराने का होईना येथील रहिवाशांना किमान घराबाबत तरी न्याय मिळाल्याची भावना असून, यातील २१ कुटूंबांना ताडदेव चिखलवाडी येथील पुनर्विकास इमारतीमध्ये घरांच्या चाव्या देण्यात आल्या आहेत. तर उर्वरित रहिवाशांनी स्वत:च्या वास्तव्याची व्यवस्था स्वत: केली आहे. भानुशाली ही इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला होता. या तळमजली अधिक सहा मजली म्हाडाच्या उपकर प्राप्त इमारतीच्या एका बाजुचा भाग कोसळला होता.  म्हाडाकडील माहितीनुसार, ही इमारत १०० वर्षे जुनी होती. 

टॅग्स :इमारत दुर्घटनामुंबईम्हाडामुंबई महानगरपालिका