म्हाडाची ‘डिजिटल’ लॉटरी

By admin | Published: July 7, 2017 06:54 AM2017-07-07T06:54:21+5:302017-07-07T06:54:21+5:30

सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न साकार करणारे म्हाडा प्राधिकरण आपल्या लॉटरी प्रक्रियेत दिवसेंदिवस अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत

MHADA's 'Digital' lottery | म्हाडाची ‘डिजिटल’ लॉटरी

म्हाडाची ‘डिजिटल’ लॉटरी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न साकार करणारे म्हाडा प्राधिकरण आपल्या लॉटरी प्रक्रियेत दिवसेंदिवस अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. विशेषत: अर्जदारांना अनामत रक्कम भरताना अडथळे येऊ नयेत म्हणून लॉटरी प्रक्रिया डिजिटल करण्याकडे म्हाडाचा कल अधिक आहे. याच प्रक्रियेंतर्गत यंदाच्या सदनिका सोडतीकरिता अर्जासोबत उत्पन्न गटानुसार अनामत रक्कम भरण्यासाठी डिमांड ड्राफ्ट (डीडी) व आॅनलाइन पेमेंटसह एनईएफटी व आरटीजीएस हा पर्यायही उपलब्ध करून दिला जाणार आहे.
म्हाडाने संगणकीय सोडत काढण्यासह अर्जविक्री, अर्ज स्वीकृती ही प्रक्रिया आॅनलाइन केली आहे. या माध्यमातून पारदर्शक, गतिमान कारभाराची प्रचिती नागरिकांना येत आहे, असा दावा म्हाडाने केला आहे. म्हाडा सदनिका सोडतीसाठी अर्ज करतेवेळी अर्जासोबत अत्यल्प उत्पन्न गटातील अर्जदारांना पंधरा हजार रुपये, अल्प उत्पन्न गटातील अर्जदारांना पंचवीस हजार रुपये, मध्यम उत्पन्न गटातील अर्जदारांना पन्नास हजार रुपये, उच्च उत्पन्न गटातील अर्जदारांना पंचाहत्तर हजार रुपये एवढी विहित अनामत रक्कम (परतावा) भरणे आवश्यक आहे. ही रक्कम भरण्यासाठी म्हाडाततर्फे आतापर्यंत डिमांड ड्राफ्ट (डीडी) व आॅनलाइन पेमेंट असे दोनच पर्याय उपलब्ध होते. यंदाच्या सोडतीपासून सद्य:स्थितीत अस्तित्वातील पर्यायांसह एनईएफटी व आरटीजीएस हे दोन वाढीव पर्याय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

म्हाडा सोडतीकरिता शहरी भागातून आॅनलाइन अनामत रक्कम भरण्यास प्राधान्य दिले जाते. ग्रामीण भागातून डिमांड ड्राफ्ट (डीडी) द्वारे अनामत रक्कम भरण्याचे प्रमाण अधिक आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून डीडी जमा केले जात असल्यामुळे डीडी काढल्यानंतर तो क्लीअर होण्यास सुमारे एक आठवड्याचा कालावधी लागतो. त्यामुळे सोडतीसाठी अंतिम पात्र अर्जदारांची यादी जाहीर करण्यास विलंब होतो. शिवाय डीडी काढण्यासाठी अर्जदाराला बँकेला जास्तीचे कमिशनही द्यावे लागते. तसेच डीडीपेक्षा एनईएफटी/आरटीजीएसची प्रक्रिया अधिक सुलभ आहे. वेळ व पैशांची बचत व्हावी म्हणून यंदा एनईएफटी/आरटीजीएस हे दोन नवीन पर्याय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी सोडतीची प्रक्रिया अधिक गतिमान होण्यास मदत होणार आहे.
- सुभाष लाखे, मुख्य
अधिकारी, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ

एनईएफटी/आरटीजीएस करण्यासाठी अर्ज सादर केल्यावर पेमेंटमध्ये गेल्यानंतर एनईएफटी/आरटीजीएस हा पर्याय निवडल्यावर एक चलन तयार होईल.
चलनावर एनईएफटी/आरटीजीएस कुठल्या खात्यावर करायचे आहे, बँकेचे व बँकेच्या शाखेचे नाव, आयएफएससी कोड इत्यादी माहिती नमूद केलेली असेल.
हे चलन घेऊन अर्जदाराचे खाते ज्या बँकेत आहे त्या बँकेत जाऊन एनईएफटी/आरटीजीएसचा त्या बँकेचा विहित अर्ज भरल्यावर उत्पन्न गटाप्रमाणे अनामत रकमेचा भरणा करता येईल.
एनईएफटी/आरटीजीएसची रक्कम त्वरित जमा होते.
अर्जदाराने एनईएफटी/आरटीजीएस केल्यावर सदरची रक्कम म्हाडाच्या खात्यावर जमा झाली आहे किंवा नाही याबाबत त्याच दिवशी अर्जदाराला माहिती मिळू शकेल.

Web Title: MHADA's 'Digital' lottery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.