Join us  

म्हाडाची हेल्पलाइन बंद झाल्याने संताप

By admin | Published: May 23, 2014 2:29 AM

आधुनिकीकरणाचा मोठा गवगवा केलेल्या म्हाडाची हेल्पलाइन (मदत कक्ष) बिल न भरल्याने तब्बल एक दिवस बंद पडण्याची नामुष्की ओढावली आहे

मुंबई : आधुनिकीकरणाचा मोठा गवगवा केलेल्या म्हाडाची हेल्पलाइन (मदत कक्ष) बिल न भरल्याने तब्बल एक दिवस बंद पडण्याची नामुष्की ओढावली आहे. म्हाडाच्या घरांच्या लॉटरीसाठी अर्ज करण्याचा अवधी कमी राहिला असताना माहिती मिळू न शकल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. अधिकार्‍यांनी पळापळ करून बिलाची पूर्तता केल्यानंतर अखेर आज दुपारी चारनंतर हेल्पलाइन पूर्ववत सुरू झाली. म्हाडातील विविध कामांबाबत, नागरिकांच्या समस्यांबाबतचे निराकरण झपाट्याने व्हावे, यासाठी जानेवारीपासून हेल्पलाइन कक्ष सुरू केला आहे. मात्र गेल्या ४ महिन्यांपासून त्याचे बिल भरले नव्हते. त्यासाठी वित्त विभागाकडून मंजुरी न मिळाल्याने ते प्रलंबित होते. त्यामुळे एमटीएनएलने बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास कनेक्शन तोडले. त्यामुळे हेल्पलाइन बंद पडली. फोनच लागत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होऊ लागला. अखेर आज सकाळी आयटी विभागातील अधिकार्‍यांनी धावपळ करीत थकीत बिल भरण्याबाबतची कार्यवाही केली. मिळालेल्या माहितीनुसार वित्त विभागाकडे दिलेले एमटीएनलचे मूळ बिलही हरविल्याने त्याची झेरॉक्स शोधून त्याद्वारे बिल भरले. दरम्यान, याबाबत माहिती तंत्रज्ञान विभागाचे उपमुख्य अभियंता अनिल अंकलगी म्हणाले, ‘काही काळ नागरिकांची गैरसोय झाल्याबद्दल दिलगीर असून थकीत बिलाची पूर्तता केली असून दुपारनंतर हेल्पलाइन पूर्ववत सुरू केली आहे. भविष्यात असे घडू नये, यासाठी दक्षता घेतली जाईल. (प्रतिनिधी)