म्हाडाच्या घरांच्या किमतीला युतीतील श्रेयवादाचा खो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 06:13 AM2018-12-01T06:13:34+5:302018-12-01T06:13:46+5:30
किमती आणखी कमी होणे कठीण : नियमांवर ठेवले बोट
मुंबई : मुंबईतील म्हाडाच्या लॉटरीतील घरांच्या किमती आणखी १० टक्क्यांनी कमी करण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाला २४ तासांत खो घातला गेला आहे. म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी शुक्रवारी तातडीने पत्रकार परिषद घेत हा निर्णय या लॉटरीसाठी घेणे तांत्रिकृष्ट्या शक्य नसल्याचे कारण पत्रकारांसमोर ठेवले. त्यासाठी त्यांनी नियमांचा हवाला दिला. म्हाडाचे मुंबई अध्यक्ष आणि भाजपा नेते मधू चव्हाण यांनी पत्राद्वारे ही मागणी सर्वप्रथम केली असल्याने निर्णय झाल्यास याचे श्रेय चव्हाणांना आणि पर्यायाने भाजपाला जाणार असल्याने शिवसेनेने तातडीने हा निर्णय लटकावल्याची चर्चा म्हाडाच्या अधिकाऱ्यांत आहे.
मुंबई मंडळाची १३८४ घरांची लॉटरी जाहीर झाल्यानंतर अल्प, अत्यल्प आणि मध्यम गटातील घरांच्या किमती या तुलनेने महाग असल्याचे निर्दशनास आले होते. याबाबत लोकांमध्ये नाराजी असल्याचे सांगत म्हाडाच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष मधू चव्हाण यांनी या गटातील घरांच्या किमती १० टक्क्यांनी कमी कराव्यात असे म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांना पत्र लिहिले होते. या पत्राची दखल घेत सामंत यांनी ११ डिसेंबरला आपल्यासोबत आणि म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाºयांसोबत किमती कमी करण्याबाबत बैठक घेणार असल्याची माहिती मधू चव्हाण यांनी दिली होती. उदय सामंत यांनीही या निर्णयाला दुजोरा दिला होता. मात्र २४ तास उलटताच तातडीने पत्रकार परिषद घेत त्यांनी माध्यमांना या लॉटरीत घरांच्या किमती आणखी १० टक्के कमी होऊ शकणार नाहीत, याला काही तांत्रिक गोष्टींची अडचण आहे, असे सांगितले. यावर माध्यमांकडून त्यांच्यावर प्रनांचा भडीमार झाला. मात्र नियमांकडे बोट दाखवत त्यांनी हतबलता व्यक्त केली. यामुळे लॉटरीत अर्ज नोंदवणाºया लाखो व्यक्तींचा भ्रमनिरास झाला आहे.
भाजपाच्या मागणीनुसार किंमती कमी करण्याचा निर्णय घेतल्यास त्याचे श्रेय भाजपाकडेच जाईल, हे लक्षात आल्याने शिवसेनेने ऐनवेळी या निर्णयापासून माघार घेत भाजपला मोठे न करण्यासाठी पळवाट शोधल्याची चर्चा दबक्या आवाजात शुक्रवारी दिवसभर म्हाडा मुख्यालयातील अधिकाºयांमध्ये रंगली होती. मात्र स्वस्त घरांचे स्वप्न पाहणाºया लाखो अर्जदारांची युतीतील या श्रेयवादाच्या राजकारणात कोंडी झाली.