पोटनिवडणुकीमुळे म्हाडाची लॉटरी रखडणार
By Admin | Published: April 5, 2015 01:36 AM2015-04-05T01:36:16+5:302015-04-05T01:36:16+5:30
म्हाडाच्या वतीने या वर्षी मुंबई व विरारमधील घरांच्या लॉटरीच्या जाहिरातीचा ‘मुहूर्त’ वांद्रे (पू.) व तासगाव विधानसभा पोटनिवडणुकीमुळे लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.
मुंबई : म्हाडाच्या वतीने या वर्षी मुंबई व विरारमधील घरांच्या लॉटरीच्या जाहिरातीचा ‘मुहूर्त’ वांद्रे (पू.) व तासगाव विधानसभा पोटनिवडणुकीमुळे लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. म्हाडाने ६ एप्रिलला जाहिरात प्रसिद्ध करण्याचे नियोजन केले होते, मात्र निवडणूक आचारसंहितेमुळे त्याला फटका बसला असून, जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत परवानगी देण्याची मागणी प्रशासनाने निवडणूक आयोगाकडे केलेली आहे.
लोकसभा निवडणुकांमुळे म्हाडाच्या घरांची सोडत गेल्या वर्षी लांबणीवर पडली होती. ३१ मेऐवजी २५ जूनला लॉटरी काढण्यात आली. या वेळीही राज्यात २ मतदारसंघात पोटनिवडणूक लागल्याने सोडतीवर परिणाम होणार आहे. मुंबईतील ९७९ व विरारमधील २ हजार ३२ आणि अपंगासाठीच्या राखीव ६६ घरांसाठी ६ एप्रिलला जाहिरात काढण्याचे नियोजन प्राधिकरणाने केले होते. मात्र आचारसंहितेच्या निकषात येत असल्यामुळे त्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्याला आयोगाची पूर्वसंमती घेणे आवश्यक आहे. या वेळीही मतदान ११ एप्रिलला झाल्यानंतरच जाहिरात प्रसिद्ध करण्याची सूचना आयोगाकडून दिली जाईल, त्यानंतर नियोजनाप्रमाणे ३१ मार्च रोजी सोडत काढण्याचा प्रयत्न आहे. परंतु इच्छुकांना अर्ज भरण्यास कमी अवधी मिळणार असल्याने तारीख पुढे ढकलली जाईल.