Join us  

'म्हाडा' अजब तुझा कारभार! अल्प उत्पन्न गटाच्या वरळीतील घराची किंमत ऐकून डोळे फिरतील

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 6:19 PM

म्हाडाकडून यंदा २०३० घरांसाठी लॉटरी काढण्यात आली असून त्यातील घरांच्या किंमतीनं सर्वसामान्य हैराण झाले आहेत. 

मुंबई - सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात हक्काचं घर मिळावं यासाठी म्हाडाकडून लॉटरी काढली जाते. मात्र गेल्या काही लॉटरीमधील म्हाडा घरांच्या किंमती पाहून अनेकजण थक्क झालेत. म्हाडा घरांच्या वाढत्या किंमती पाहून लॉटरीलाही अल्प प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येते. त्यात नुकतेच म्हाडानं मुंबईतील २०३० घरांसाठी लॉटरी काढली आहे. या लॉटरीत वरळी भागात असणाऱ्या ५५० स्क्वेअर फूट घराची किंमत ऐकून तुम्हीही चक्रवाल. 

वरळीतील सस्मिरा मार्गावरील या घरांसाठी म्हाडानं तब्बल २ कोटी ६२ लाख इतकी किंमत ठेवली आहे. त्यावरही मालमत्ता आणि नोंदणी शुल्क लॉटरी विजेत्यालाच भरावा लागणार आहे. विशेष म्हणजे हे घर अल्प उत्पन्न असलेल्या प्रवर्गासाठी आहे ज्यांची उत्पन्न मर्यादाला वर्षाला ९ लाखांपर्यंत ठेवली आहे. त्यामुळे ९ लाख उत्पन्न असलेला व्यक्ती घरावर २ कोटींपर्यंत कर्ज कसा घेऊ शकतो हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे. म्हाडाच्या घरांची कोट्यवधी उड्डाणे पाहून अनेकांच्या पोटात गोळा आलेला आहे.

याच म्हाडा लॉटरीत उच्च उत्पन्न गटातील क्रिसेंट टॉवर, ताडदेव येथील घराची किंमत जवळपास ७ कोटी ५७ लाख इतकी आहे. दादर, भायखळा, अंधेरी, वडाळा, सायन, पवई या भागातील घरांच्या किंमती या कोट्यवधीच्या घरात आहेत. तर दुसरीकडे म्हाडा लॉटरीत सर्वात कमी किंमतीचे घर हे मानखुर्द इथल्या पीएमजीपी कॉलनीतील आहे. इथे घराची किंमत २९ लाख ३७ हजार इतकी ठेवण्यात आली आहे. यंदाच्या म्हाडा लॉटरीत सर्वसामान्यांना परवडणारी घरे ३० लाख ते साडे सात कोटी किंमतीची आहेत. 

दरम्यान, म्हाडाच्या १ हजार घरांसाठी १ लाख लोक लॉटरीत पुढे यायचे, मात्र गेल्या २ लॉटरीत लोकांचा फार मोठा प्रतिसाद म्हाडा लॉटरीला मिळत नाही. कारण बाजारात त्याच्यापेक्षा कमी भावात घर मिळत असेल तर म्हाडाचे घर लोक का घेतील. म्हाडाला मोफत मिळालेल्या जमिनीवर या इमारती बांधल्या जातात. कुठून विक्री करून आणली नाही. अधिकचे चटई क्षेत्र मिळवूनही सर्वसामान्यांना तोंडाला पान पुसण्याचं काम या सरकारने आणि दुर्दैवाने म्हाडाने केले आहे अशी टीका ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी केली आहे.  

टॅग्स :म्हाडा