Join us

म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे ५६४७ सदनिकांच्या सोडतीसाठी अर्ज नोंदणीला उद्यापासून प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 20:07 IST

सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही

मुंबई : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा विभागीय घटक) पुणे, सोलापूर, कोल्हापूर व सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेतील ५ हजार ६४७ सदनिका व कोल्हापूर येथील ६८ भूखंडांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी, अर्ज करणे या प्रक्रियेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मंत्रालयातील समिती कक्षामध्ये १० डिसेंबर रोजी दुपारी २.३० वाजता करण्यात येणार आहे.

या सोडतीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या पुणे जिल्ह्यातील म्हाळुंगे येथे ५१४ सदनिका, तळेगाव दाभाडे (ता. मावळ) येथे २९६ सदनिका, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे ७७ सदनिका, सांगली येथे ७४ सदनिकांचा समावेश आहे. तसेच  म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या मोरवाडी पिंपरी (पुणे) येथील ८७ सदनिका, पिंपरी वाघिरे (पुणे) येथील ९९२ सदनिका तर सांगली येथील १२९ सदनिकांचा देखील या सोडतीत समावेश आहे. या सोडतीत अत्यल्प , अल्प , मध्यम आणि उच्च उत्पन्न गटांसाठी सदनिका उपलब्ध आहेत.  तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथील ६८ भूखंड देखील या सोडतीत विक्रीसाठी उपलब्ध करवून देण्यात आले आहेत. 

१० डिसेंबर, २०२० रोजी दुपारी ३ वाजेपासून ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात होणार असून  नोंदणीकृत अर्जदार सायंकाळी ६ वाजेपासून  ऑनलाईन अर्ज भरू शकतील. तसेच  ऑनलाईन अर्ज  नोंदणी साठी दिनांक  ११ जानेवारी, २०२१ पर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्जदारांना ऑनलाईन अर्ज  नोंदणी करता येणार आहे.  दिनांक १२ जानेवारी, २०२१ रात्री ११.०० वाजेपर्यंत अर्जदारांना ऑनलाईन अर्ज  सादर करता येणार आहेत. दिनांक १३ जानेवारी, २०२१ रोजी रात्री ११.०० पर्यंत ऑनलाइन  अनामत रक्कमेची स्वीकृती केली जाणार आहे. तसेच दिनांक १३ जानेवारी, २०२१ रोजी संबंधित बँकांच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल.

https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर सदनिका सोडतीबाबत माहिती पुस्तिका व अर्जाचा नमुना उपलब्ध राहील. दिनांक २२ जानेवारी, २०२१ रोजी प्राप्त अर्जाची सोडत कार्यक्रम पुणे मंडळाच्या कार्यालयात सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात येणार आहे.  सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये तसे केल्यास पुणे मंडळ कोणत्याही व्यवहारास / फसवणूकीस जबाबदार राहणार नाही, असे आवाहन म्हाडातर्फे करण्यात येत आहे.

टॅग्स :म्हाडामुंबईपुणे