मुंबई : शहरात सुमारे १४ हजार २८६ उपकरप्राप्त इमारती आहेत. यातील जवळपास सर्वच इमारती जुन्या व मोडकळीस आल्या आहेत. दरवर्षी म्हाडाच्या दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळामार्फत या इमारतींचे सर्वेक्षण करून पावसाळ्यापूर्वी अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. या वर्षी एकूण ७ इमारती या अतिधोकादायकआढळून आल्या आहेत. यातील ६ इमारती या मागील वर्षीच्या आहेत. या इमारतींमध्ये २१४ निवासी अधिक १८९ अनिवासी आहेत. एकूण ४०३ रहिवाशांपैकी १११ रहिवाशांनी पर्यायी व्यवस्था केली आहे. तर फक्त २ रहिवाशांना म्हाडातर्फे संक्रमण शिबिरात पर्यायी जागा देण्यात आली आहे. या इमारती तातडीने रिकाम्या करून संक्रमण शिबिरात तात्पुरते स्थलांतर करण्याचे काम म्हाडामार्फत लवकरच सुरू करण्यात येणार आहे.या अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्यासाठी या इमारतीतील रहिवाशांनी म्हाडाला सहकार्य करावे, असे आवाहन म्हाडाने केले आहे. पावसाळ्यात होणारी वित्त व जीवितहानी पाहता म्हाडाने या रहिवाशांना घरे खाली करण्याची नोटीस गेल्या वर्षापासून बजावण्यास सुरुवात केली होती. तरीही यातील काही रहिवाशांनी आपली घरे खाली केलेली नाहीत. या रहिवाशांना आता १० दिवसांच्या आत सक्तीने घराबाहेर काढण्याचे आदेश म्हाडा अधिकाऱ्यांना दिले असल्याचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी शनिवारी म्हाडा मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. येत्या १५ दिवसांत मुंबईतील उपकरप्राप्त इमारतीसंदर्भात धोरण जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती या वेळी प्रकाश मेहता यांनी दिली.इमारती धोकादायक जाहीर करूनही काही इमारतींतील रहिवाशांना बाहेर काढण्यास म्हाडाला अपयश येत असून, आता म्हाडाने १० दिवसांत रहिवाशांना सक्तीने घराबाहेर काढावे आणि या कारवाईत रहिवाशांनी स्वत:हून पुढे येऊन म्हाडाला घरे खाली करण्यास सहकार्य करावे, असे आवाहनया वेळी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी केले.मुंबईतील अतिधोेकायक इमारती१) १४४, एम.जी. रोड (एक्स्पनेंड मेन्शन)२) २०८-२२०, काझी सय्यद स्ट्रीट३) १०१-१११, बारा इमाम रोड (सी ७२५५)४) ३०-३२, दुसरी सुतारगल्ली५) ६९-८१, खेतवाडी तिसरी गल्ली, गणेश भुवन६) ३९, चौपाटी सी फेस७) इमारत क्र. ४६-५०, लकी मेंशन, क्लेअर रोड
म्हाडाच्या सात इमारती अतिधोकादायक, 10 दिवसांत घरे रिकामी करावी लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2018 12:21 AM