मोठ्या धक्क्यानंतर म्हैसकर दाम्पत्य पुन्हा एकदा झाले आई - बाबा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 03:13 PM2018-08-22T15:13:54+5:302018-08-22T16:43:40+5:30
राज्याचे वरिष्ठ सरकारी अधिकारी मनिषा आणि मिलिंद म्हैसकर यांना आयव्हीएफ तंत्रज्ञानाने जुळ्या मुली झाल्या आहेत.
मुंबई - गेल्या वर्षी मन्मथ या म्हैसकर दाम्पत्याच्या एकुलत्या एक मुलाने इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली. त्यानंतर मानसिक धक्का बसलेल्या म्हैसकर दाम्पत्याने डिसेंबर २०१७ मध्ये पुन्हा एकदा आई - बाबा होण्याचा निर्णय घेतला आणि ते झाले. राज्याचे वरिष्ठ सरकारी अधिकारी मनीषा आणि मिलिंद म्हैसकर यांना आयव्हीएफ तंत्रज्ञानाने जुळ्या मुली झाल्या आहेत.
या मुलींना शुक्रवारी रुग्णालयातून घरी नेण्यात येणार आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सरोगसीच्या माध्यमातून या मुली जन्माला आल्या. आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ. जतीन शहा यांनी ही सरोगसी केल्याचे समजते, मात्र म्हैसकर कुटुंबाला याबाबतचा अधिक तपशील देण्यास इच्छुक नाही. मनिषा म्हैसकर या शहर विकास विभागाच्या प्रधान सचिव तर मिलिंद म्हैसकर हे म्हाडाचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
काय असते आयव्हीएफ ट्रीटमेंट ?
आययूआय ही ट्रीटमेंट आयव्हीएफची अगोदरची स्टेज आहे. ही अतिशय साधी चाचणी असते. यामध्ये पुरुषाच्या वीर्याची तपासणी करून शुक्राणू किती सक्षम आहेत हे पाहिलं जातं तर स्त्रीयां सोनोग्राफी करून गर्भाशय, गर्भनलिका व्यवस्थित आहे का हे पाहिलं जातं. स्त्रीबीज कलीन होताहेत का हे पाहिलं जातं. यावर उपाय केले जातात. यामुळे गर्भधारणेचे प्रमाण वाढते. आययूआय करूनही फरक पडला नाही तर मात्र आयव्हीएफ केले जाते. यामध्येदेखील सर्वप्रथम सर्व वैद्यकीय चाचण्या करून घेतल्या जातात. गर्भनलिकेत ब्लॉकेज असतील, स्त्रीबीज वाढत नसेल, पुरुषाच्या वीर्यात शुक्राणू नसतील. मात्र ते अंडकोशात असतील तर ते बाहेर काढले जातात आणि विशिष्ट वातावरणात त्याचे कृत्रिमरीत्या फलन घडवून ते पुन्हा गर्भाशयात सोडले जातात आणि गर्भधारणा होते.