लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सप्टेंबर १५ पासून राज्यात सीईटी परीक्षेला सुरुवात झाली आहे. तर उद्यापासून एमएचटी सीईटी परीक्षेला सुरुवात होत आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, औषध निर्माणशास्त्र या अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी एमएचटी सीईटी परीक्षा सीईटी सेलमार्फत घेतली जात आहे. यंदा या परीक्षेसाठी एकूण पीसीएम आणि पीसीबी या गटांसाठी परीक्षा देण्यासाठी ४ लाख २४ हजार ४७७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. पीसीएम आणि पीसीबी या दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास ८१ हजार आहे. राज्यात २२० केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा होणार असल्याने परीक्षा केंद्रांवर कोरोनाचे सर्व नियम पाळून विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.
मुंबई महानगर क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अद्याप लोकल प्रवासाची परवानगी नाही, त्यामुळे या परीक्षांसाठी परीक्षा केंद्रावर पोहोचायचे कसे हा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे होता. दरम्यान,राज्य शासनाच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून रेल्वेला पत्र देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेशपत्राच्या सहाय्याने प्रवास करता येणार असल्याची माहिती सीईटी सेल अधिकाऱ्यांनी दिली आहे.
यंदा नोंदणीत घट ?
गेल्यावर्षी या सीईटीसाठी ५ लाख ४२ हजार ४३१ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली होती; मात्र यंदा या सीईटीसाठी मुदतवाढ पकडून एकूण नोंदणी ४ लाख २४ हजार ७७३ झाली आहे. नोंदणी कमी झाल्याने, याचा थेट परिणाम प्रवेश प्रक्रियेवर होऊन यंदा व्यावसायिक प्रवेशात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, स्थलांतर करावे लागले, यामुळे विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर थेट परिणाम झाला आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांना असणारे शुल्क पालकांना भरणे अवघड झाले आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शुल्क साधारणतः ५० हजार ते २ लाख प्रतिवर्ष असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणातून विशेषतः व्यावसायिक शिक्षणाकडे पाठ फिरवली असल्याचे मत महाविद्यालयीन प्राचार्य व्यक्त करीत आहेत. मागील काही वर्षांत औषध निर्माणशास्त्र आणि कृषीकडे विद्यार्थ्यांचा कल जास्त दिसून आला आहे. परिणामी अभियांत्रिकीला यंदा मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहण्याची शक्यता अभ्यासकांकडून वर्तवण्यात येत आहे.
-------------
गट - विद्यार्थी संख्या
पीसीएम - १ लाख ४७ हजार ४७१
पीसीबी - १ लाख ९६ हजार २८८
पीसीएम आणि पीसीबी दोन्ही परीक्षा देणारे विद्यार्थी - ८१०१५