लोकमत न्यूज नेटवर्क , मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) इंजिनिअरिंग, कृषी, फार्मसी या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता घेण्यात आलेल्या ‘एमएचटी-सीईटी’त पीसीबी आणि पीसीएम विषयगटात मिळून ३७ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल मिळविण्याची कामगिरी केली आहे. रविवारी एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर करण्यात आला.
मृदुल समीर जोशी, सन्मय विक्रम शाह, अभिषेक विरेंद्र झा, आद्या दुर्गाप्रसाद हरिचंदन, मोहम्मद इस्माईल नाईक या मुंबई-ठाण्यातील विद्यार्थ्यांनी पीसीबी विषयगटात १०० पर्सेंटाईल मिळविले आहेत. तर पुष्कर विनय ब्याडगी, मैत्रेय वाळिंबे, मोक्ष निमेश पटेल, वंशिका शहा, प्रणव अरोरा या मुंबईतील विद्यार्थ्यांनी पीसीएम गटात अव्वल यश मिळविले आहे.
अनुसूचित जाती (एससी)प्रवर्गातून पीसीबी गटात मुंबईच्या परेश किशोर क्षेत्री याने ९९.९९ पर्सेंटाईल मिळवून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. तर पीसीएममध्ये नागपूरच्या साना उदय वानखेडे हिने ९९.९७ पर्सेंटाईल मिळविले आहेत. अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून पीसीबी गटात अकोल्याच्या सृजन गजानन अत्राम याने ९९.९७ पर्सेंटाईल मिळवून प्रथम येण्याची कामगिरी केली. तर पीसीएममध्ये रांचीचा सुयंश अरविंद चौहान याने ९९.९९ पर्सेंटाईल मिळविले आहेत. एमएचटी-सीईटीत १०० पर्सेंटाइल मिळविणाऱ्या पीसीएमच्या २० विद्यार्थ्यांमध्ये १३ मुले आहेत, तर सात मुली आहेत, तर पीसीबीत ११ मुले आणि सहा मुली आहेत. पीसीएमकरिता एकूण १.४ लाख मुलींना सीईटी दिली, तर मुले होते २.४ लाख, तर पीसीबीकरिता १.७ लाख मुलींनी, तर १.३ लाख मुलांनी सीईटी दिली.
ओबीसी प्रवर्गातील टॉपर्स (सर्वांना १०० पर्सेंटाईल)
पीसीबी ग्रुप- श्रावणी कैलाश चोटे (अहमदनगर)- श्रेया विलास भोळे (अकोला)- आदेश निचट (अमरावती) - फहाद मोहम्मद कलिम अन्सारी (धुळे)- सोहम भीमराव लगड (पुणे)पीसीएम ग्रुप- पार्थ पद्मभूषण असाती (नागपूर)- आर्यन भुरे (रांची)
पालकांना मनस्ताप- सीईटी-सेलच्या वेबसाईटवर रविवारी सायंकाळी ६ वाजता निकाल जाहीर करण्यात येणार होता. - सहानंतरही साईट डाऊन असल्याने अनेकांना निकाल पाहता आला नाही. रात्री ८ वाजेपर्यंत निकाल पाहता न आल्याने विद्यार्थी-पालक हतबल होते.
१०० पर्सेंटाईल मिळविणाऱ्यांची संख्या वाढली. गेल्या वर्षी पीसीएम, पीसीबी गटात मिळून २८ जणांना १०० पर्सेंटाईल मिळाले होते. यंदा ही संख्या ३७ वर गेली आहे.