मुंबई : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली राज्य सामाईक प्रवेश परीक्षा एमएचटी-सीईटी- २०२२ महाराष्ट्र राज्यातील ३६ जिल्ह्यांची ठिकाणी २२७ परीक्षा परीक्षाकेंद्रावर ऑनलाईन पध्दतीने १३ दिवसात २५ सत्रामध्ये घेण्यात आली. पीसीएम आणि पीसीबी या २ गटांत झालेल्या या परीक्षेत पीसीएम गटातून १३ विद्यार्थ्यांना १०० पर्सेन्टाइल तर पीसीबी गटातून १४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेन्टाइल गुण प्राप्त झाले आहेत.
या परीक्षेचा निकाल सीईटी सेलकडून गुरुवारी जाहीर करण्यात आला असून विद्यार्थ्यांना तो सीईटीच्या अधिकृत संकेस्थस्थळावर पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांनी आपला निकाल https://mhitcet2022.mahacet.org/StaticPages/HomePage या संकेतस्थळावर पाहून डाउनलोड करावा असे आवाहन सीईटी सेलचे आयुक्त रवींद्र जगताप यांनी केले आहे.
एमएचटी सीईटी परीक्षेला पीसीएम गटाच्या परीक्षेसाठी २८२०७० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी २३१२६४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आणि उपस्थितांची टक्केवारी ८१. ९९ टक्के आहे. पीसीबी गटासाठी ३२३८७४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती आणि त्यापैकी २३६११५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पीसीबी गटासाठी उपस्थिताची टक्केवारी ७२. ९० टक्के इतकी होती.