एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित
By रेश्मा शिवडेकर | Published: June 2, 2024 07:34 AM2024-06-02T07:34:04+5:302024-06-02T07:34:16+5:30
१० मे रोजी दुसऱ्या शिफ्टमध्ये विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचा फॉर्म्युला तर अभ्यासक्रमातच नसल्याचा विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे.
मुंबई : एप्रिल-मे दरम्यान झालेल्या ‘एमएचटी-सीईटी’च्या गणित विषयाच्या चार प्रश्नांच्या उत्तरतालिकेतील चुकीच्या उत्तरांची दखलच राज्याच्या ‘सीईटी सेल’ने घेतली नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.
१० मे रोजी दुसऱ्या शिफ्टमध्ये विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचा फॉर्म्युला तर अभ्यासक्रमातच नसल्याचा विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे. महत्त्वाचे म्हणजे हाच प्रश्न गेल्यावर्षीही विचारण्यात आला होता. त्यावेळीही विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवला होता. मात्र, तेव्हाही त्याची दखल घेतली गेली नव्हती. या प्रकारामुळे ‘एमएचटी-सीईटी’च्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे, अशी तक्रार ‘माईंडसेटर्स प्रायव्हेट ट्युशन्स’चे प्रा. सुनील भट यांनी उपस्थित केला.
ही परीक्षा २२ ते ३० एप्रिल (पीसीबी) आणि २ ते १६ मे (पीसीएम) दरम्यान घेण्यात आली होती. एकूण ३० सत्रांत ही परीक्षा झाली. त्यात भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, गणित, रसायनशास्त्र या विषयांवरील एकूण ५,१०० प्रश्नांचा समावेश होता. या प्रश्नांबाबत १४२५ आक्षेप नोंदवण्यात आले होते. त्यापैकी ४७ आक्षेपांचे निराकरण करण्यात आले.
यात गणितातील चार प्रश्नांचा समावेश नसल्याने अनेक चिंताग्रस्त विद्यार्थ्यांनी सीईटी सेलला भेट देऊन आतापर्यंत हा प्रकार लक्षात आणून दिला आहे. मात्र, आता कोणतीही दुरुस्ती केली जाणार नाही, असे सेलकडून सांगण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा जीव आता टांगणीला लागला आहे.
एक आक्षेप एक हजाराचा
प्रश्नावर आक्षेप घेणेही विद्यार्थी-पालकांसाठी महागडे प्रकरण ठरते. प्रत्येक प्रश्नाकरिता पालकांना एक हजार रुपये मोजावे लागतात. परंतु, ते मोजूनही विद्यार्थ्यांच्या आक्षेपांचे योग्य निराकरण होत नसल्याचे दिसून येते.
आक्षेप असलेले इतर तीन प्रश्न
३ मे रोजी दुसऱ्या शिफ्टमध्ये इक्वेशनबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर ‘९४४७३८’ असताना ते चुकीचे ‘९४४७४०’ असे दाखविण्यात आले आहे.
१० मे रोजी दुसऱ्या शिफ्टमध्ये विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचे दिलेले सर्वच पर्याय चुकीचे असताना ‘९५०९७०’ हे चुकीचे उत्तर बरोबर म्हणून दाखविण्यात आले आहे.
११ मे रोजी दुसऱ्या शिफ्टमध्ये सोल्युशन्सबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर ‘९५२२४५’ असताना ते चुकीचे ‘९५२२६’ दाखविण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना नाहक त्रास
प्रवेशाकरिता एकेका गुणासाठी विद्यार्थी झगडत असताना केवळ उत्तरतालिकेतील चुका किंवा त्रुटींमुळे त्यांचे नाहक नुकसान होणार आहे, अशी व्यथा एका पालकाने मांडली.