लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रत्येक कोविड रुग्णास वेळेत उपचार मिळावेत, यासाठी गावपातळीपासून नियोजनाची गरज आहे. आपल्याकडे ग्रामीण भागात साधारणपणे प्रत्येक पाच हजार लोकसंख्येला एक उपकेंद्र आहे. राज्यात एकूण १०,५०० पेक्षा अधिक उपकेंद्रे आहेत. आजच्या घडीला राज्यात सात लाखांच्या आसपास कोविडचे सक्रिय रुग्ण आहेत. ग्रामीण भागात प्रत्येक उपकेंद्र स्तरावर २० ते २५ पेक्षा अधिक रुग्ण नाहीत. अर्थात काही भागात हे प्रमाण कमी जास्त असू शकते. हे रुग्ण ग्रामीण भागामध्ये चांगले सूक्ष्म नियोजन करून हाताळणे सहज शक्य आहे, अशी माहिती आराेग्य विभागाचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.
ग्रामीण भागातील कम्युनिटी मॉडेल आणि सूक्ष्म नियोजन -
ग्रामीण भागातील ज्या काेराेनाबाधित व्यक्तींना सौम्य स्वरूपाचा आजार आहे त्यांना घरच्या घरी वेगळे करून उपचार करणे शक्य आहे. यासाठी प्रत्येक ठिकाणच्या खासगी डॉक्टरांना यात सहभागी करून घेणे आवश्यक आहे. तथापि, काही वेळा आजार सौम्य असला तरी घरात पुरेशी जागा नसते म्हणून गावपातळीवर छोटी छोटी कोविड सेंटर उभारणे गरजेचे आहे. गावातील जाणत्या लोकांच्या पुढाकाराने हे शक्य आहे.
ग्रामीण भागातील डॉक्टरांची यादी करून त्यानुसार किमान प्रत्येक उपकेंद्र स्तरावर किंवा जी मोठी गावे आहेत, जेथे आठवडी बाजार भरतो अशा मध्यवर्ती गावांमध्ये कोविड केअर सेंटर उभारायला हवीत. अशा प्रकारे ग्रामीण भागात एका तालुक्यात सरासरी ३० ते ५० छोटी छोटी कोविड केअर सेंटर ( १० ते २० खाटांची) उभी करणे शक्य आहे.
ग्रामीण भागातील खासगी दवाखाने, समाज मंदिर, शाळा अशा जागांचा वापर कोविड केअर सेंटर म्हणून करावा.
कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर उपलब्ध करण्याचा प्रयत्न करावा. येथे ॲन्टिजन तपासणीचीही सोय उपलब्ध असावी.
अनेकदा संसर्गाची तीव्रता समजण्यासाठी रक्ताच्या इतर काही तपासण्या करणे आवश्यक असते. यासाठी तालुका पातळीवरील प्रयोगशाळांना ही सेंटर्स जोडावीत. या प्रयोगशाळेतील कर्मचारी गरजेनुसार या कोविड केअर सेंटरमधील रक्त नमुने संकलित करतील.
या कोविड केअर सेंटरचे फोन नंबर परिसरातील गावांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पाेहाेचवावेत.
या कोविड केअर सेंटरमध्ये काम करण्यासाठी खासगी डॉक्टर्स, उपकेंद्रातील नर्सेस, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या यांची मदत घ्यावी. ग्रामीण भागात प्रत्येक एक हजार लोकसंख्येला एक आशा कार्यकर्ती आहे. या कार्यकर्तींचा या कामी चांगला उपयोग होऊ शकतो. याशिवाय गावपातळीवरील तरुण कार्यकर्ते, युवक मंडळांचे सदस्य, शिक्षक, लॉकडाऊनमुळे घरी असणारे इतर शासकीय कर्मचारी, आरोग्य खात्यातील निवृत्त लोक यांना या कोविड केअर सेंटरच्या कामात सहभागी करावे.
हे सारे स्वयंसेवक गावपातळीवर जे लोक घरगुती विलगीकरणात आहेत, त्यांना मार्गदर्शन आणि मदत करण्याचे काम करतील.
✓ जे लोक घरच्या घरी विलगीकरणात आहेत त्यांच्यावर दैनंदिन लक्ष हे कोविड केअर सेंटरला जोडलेले स्वयंसेवकांचे पथक करेल.
✓ महिला बचत गट, दानशूर व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने अशा कोविड केअर सेंटरच्या ठिकाणी नाश्ता, जेवण आणि इतर आवश्यक सुविधा पुरविणे शक्य आहे.
✓ तालुका पातळीवर कार्यरत तालुका आरोग्य अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलिस अधिकारी यांच्या सहकार्याने प्रत्येक तालुक्याला असे मॉडेल विकसित करता येईल.
✓ योग वर्ग, भजन, ध्यान अशा बाबींसाठी वेळ देऊन ही कोविड सेंटर्स आनंददायी आणि प्रसन्न बनवता येतील.
✓ गावपातळीवर घराच्या जवळपास ही कोविड केअर सेंटर असल्याने त्याचा रुग्ण बरे होण्यावर सकारात्मक परिणाम होईल. तसेच असे मॉडेल आर्थिक दृष्ट्याही रुग्णांना परवडणारे असेल.
................................