Join us

सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांचा वाटा ५० टक्क्यांपर्यंत नेणार; ‘अलीबाबा’च्या धर्तीवर ‘भारत क्राफ्ट’ची करणार उभारणी - गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 12:49 AM

राष्ट्रीय शेअर बाजारातील (एनएसई) या नोंदणीसाठी गडकरी यांच्या उपस्थितीत पारंपरिक ‘बेल सेरेमनी’ पार पडली.

मुंबई : सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांचा (एमएसएमई) देशाच्या दरडोई उत्पन्नातील वाटा सध्या २९ टक्के आहे. आगामी पाच वर्षांत तो ५० टक्क्यांपर्यंत नेऊ, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी केले. गडकरी यांच्या उपस्थितीत २०० व्या एमएसएमईची राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये नोंदणी करण्यात आली. या वेळी ते बोलत होते.राष्ट्रीय शेअर बाजारातील (एनएसई) या नोंदणीसाठी गडकरी यांच्या उपस्थितीत पारंपरिक ‘बेल सेरेमनी’ पार पडली. या वेळी एनएसईचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम लिमये उपस्थित होते. २०१२ साली एनएसईमध्ये सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांच्या नोंदणीसाठी ‘एनएसई इमर्ज्’ ही विशेष व्यवस्था करण्यात आली. त्यात आज २०० व्या उद्योगाची नोंदणी करण्यात आली. मागील सात वर्षांत या उद्योगांनी बाजारातून सुमारे ३१०० कोटींची गुंतवणूक उभी केली. आज त्याचे बाजारमूल्य ८,८०० कोटींच्या घरात गेले आहे. तर आतापर्यंत २२ उद्योग आपला पसारा वाढवत एमएसएमईतून मुख्य शेअर मार्केटमध्ये दाखल झाले आहेत. या वेळी गडकरी म्हणाले, रोजगाराच्या संधी, निर्यात आणि उत्पन्नवाढीच्या दृष्टीने एमएसएमई अत्यंत महत्त्वाचे आहे.देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याचे काम या उद्योगांमुळे होते. तब्बल ११ कोटींना रोजगार आणि दरडोई उत्पन्नात २९ टक्के इतका वाटा या क्षेत्राचा आहे. येत्या पाच वर्षांत या क्षेत्राच्या माध्यमातून १५ कोटी लोकांना रोजगार देत दरडोई उत्पन्नातील वाटा ५० टक्क्यांवर नेण्याचे सरकारचे धोरण आहे. एमएसएमईसाठी ‘अलीबाबा’ या जागतिक पोर्टलच्या धर्तीवर ‘भारत क्राफ्ट’ हा प्लॅटफॉर्म उभारण्यात येणार असून, त्यातून तब्बल १० लाख कोटींची उलाढाल अपेक्षित असल्याचेही गडकरी म्हणाले.लघू आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणात एनएसईने कायमच पुढाकार घेतल्याचे लिमये यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. पारंपरिक उद्योगांसोबतच नव्याने पुढे येत असलेल्या स्टार्टअपसाठी आवश्यक गुंतवणूक उभारण्यासाठी एनएसईने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. इतकेच नव्हे तर अर्थव्यवस्थेच्या वाढीसोबतच रोजगार आणि सर्वसमावेशक विकासासाठी एमएसएमईची भूमिका कायमच महत्त्वाची राहिल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :नितीन गडकरी