कोरोनाचे टेन्शन नको, संक्रमित रोगप्रतिकारक शक्तीमुळे धोका नसल्याचे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांचे मत

By संतोष आंधळे | Published: December 23, 2022 07:14 AM2022-12-23T07:14:23+5:302022-12-23T07:14:59+5:30

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने चीनमध्ये थैमान घातले असल्याने भारतातही सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे

Microbiologists are of the opinion that there is no danger due to the infected immune system coronavirus patients increase | कोरोनाचे टेन्शन नको, संक्रमित रोगप्रतिकारक शक्तीमुळे धोका नसल्याचे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांचे मत

कोरोनाचे टेन्शन नको, संक्रमित रोगप्रतिकारक शक्तीमुळे धोका नसल्याचे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांचे मत

googlenewsNext

संतोष आंधळे 
मुंबई : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने चीनमध्ये थैमान घातले असल्याने भारतातही सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनीही सर्व राज्यांना पत्र लिहून सतर्क राहण्याचे सूचविल्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. मात्र, आपल्याकडे संक्रमित रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली असल्याने नव्या विषाणूच्या उद्रेकामुळे घाबरण्याची गरज नसल्याचे कोरोना विषाणूचा अभ्यास करणाऱ्या सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. 

सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांच्या मते कोरोना विषाणूमध्ये गेल्या दोन वर्षांत अनेक जनुकीय बदल झाले आहेत. त्यामुळे त्याच्याविरोधात लढण्याची रोगप्रतिकारक शक्ती आपल्याला प्राप्त झाली आहे. लसीकरणाचे प्रमाण आपल्याकडे प्रचंड आहे. अनेकांनी कोरोनाप्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण केले आहेत, तर ज्येष्ठांना बूस्टर डोसही देण्यात आले आहेत. अनेकदा विषाणू  जिवंत राहण्यासाठी स्वतःमध्ये बदल करून नव्या रूपात येत असतात. 

प्रतिपिंडांमुळे काेराेनाला अटकाव 
 काही वेळा नव्या व्हेरिएंटचा नागरिकांवर काही परिणाम होत नाही. ओमायक्रॉनच्या बाबतीत तेच घडले, सुरुवातीच्या काळात भयानक वाटणाऱ्या या विषाणूमुळे फारसा काही त्रास झाला नाही. 
 कारण बहुतांश नागिरकांनी लसीकरण करून घेतल्यामुळे त्या आजाराच्या विरोधातील प्रतिपिंडे नागरिकांच्या शरीरात होती. त्यामुळे त्यांना या विषाणूच्या आजाराचा त्रास जाणवला नाही.  

राज्यात कोरोनाचे प्रमाण कमी होत असून या आठवड्यात गेल्या आठवड्याच्या तुलनेत नवीन रुग्ण संख्या ३० टक्क्यांनी कमी झाली आहे. विषेश म्हणजे चीनमध्ये  ज्या बीएफ.७ या व्हेरिएंटमुळे कोरोनाचा उद्रेक झाला आहे, तो भारतात यापूर्वीच आढळलेला आहे. त्यामुळे भीती बाळगण्याची गरज नाही. 
आरोग्य विभाग, राज्य सरकार 

कोरोनाचा उपप्रकार किंवा नवीन प्रकार कसा शोधायचा यासाठी आपल्याकडे जीनोम सिक्वेन्सिंग करण्याचे काम सुरू आहे. त्याशिवाय  मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले आहे. त्यामुळे आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती प्राप्त झाली आहे. गेल्या दोन-तीन वर्षांच्या काळात अनेक विषाणूंचे प्रकार आपण पाहिले आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थतीत घाबरण्याची अजिबात गरज नाही. मात्र सतर्क राहणे गरजेचे आहे.    
- डॉ. अमिता जोशी,
विभाग प्रमुख, सूक्ष्मजीवशास्त्र, जे. जे. रुग्णालय 

कोरोनाची साथ चालू झाल्यापासून या विषाणूच्या बदलत्या स्वरूपावर लक्ष ठेवून आहोत. त्यासाठी जनुकीय बदलाच्या चाचण्या केल्या जातात. प्रत्येक विषाणू एका ठरवीक कालावधीनंतर स्वतःचे रूप बदलत असतो. ते आम्हाला पॉझिटिव्ह रुग्णाच्या नमुने तपासणीनंतर कळत असते. सध्या तरी आपल्याकडे असा कुठला नवीन कोरोनाच्या उपप्रकाराचा विषाणू आढळून आलेला नाही. लसीकरणामुळे आपल्याकडे नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती सक्षम झालेली आहे. लहान मुलांमध्येही रोगप्रतिकारक शक्ती वाढली आहे. पण तरीही सध्याची स्थिती पाहता आपण स्वतःची काळजी म्हणून मास्क वापरायला हवा. यामुळे नागरिकांना फायदा होईल. कोरोना प्रसार टळेल. 
- डॉ. कांचन वंजारी, 
अतिरिक्त प्राध्यापक, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, सायन हॉस्पिटल

Web Title: Microbiologists are of the opinion that there is no danger due to the infected immune system coronavirus patients increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.