मुंबई - गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय उलथापालथींदरम्यान, राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता आहे, असं विधान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभा संपर्कप्रमुखांच्या बैठकीत केले होते, दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या दाव्यावर बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून जोरदार टीका होत आहे. अशा प्रकारची विधाने केवळ उरलेला पक्ष टिकवण्यासाठी आणि कार्यकर्ते आपल्याकडे ठेवण्यासाठी केली जात आहेत. मात्र कार्यकर्ते हे काही दुधखुळे नाहीत, असा टोला शिंदे गटातील नेते नरेश म्हस्के यांनी लगावला आहे. तर ठाकरे गटाने आत्मपरीक्षण केलं पाहिजे, असा सल्ला दीपक केसरकर यांनी दिला आहे.
उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर टीका करताना नरेश म्हस्के म्हणाले की, ठाकरे गटातील जिल्हा संपर्क प्रमुख आणि शिल्लक राहिलेले पदाधिकारी यांच्या बैठका मातोश्रीवर सुरू आहेत. त्यामधून समोर आलंय की सर्वच अॅक्टिव्ह काम करणारे पदाधिकारी हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. त्यांच्यासोबत काम करत आहेत. तसेच उरलेल्या मंडळींपैकी ७० ते ८० टक्के लोक कुंपणावर आहेत. तसेच ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याच्या मनस्थितीत आहेत. या लोकांना आपल्यासोबत टिकवण्याचे मोठे आव्हान मातोश्रीसमोर आहे. या लोकांना आपल्याकडे टिकवण्यासाठी त्यांच्या मनात संभ्रम निर्माण करण्यासाठी लवकरात लवकर राष्ट्रपती राजवट लागेल, मध्यावधी निवडणुका लागतील, अशी विधानं केली जात आहेत. अशा प्रकारची वक्तव्य केवळ उरलेली शिवसेना टिकवण्यासाठी कार्यकर्ते आपल्याकडे ठेवण्यासाठी केली जात आहेत. मात्र कार्यकर्ते हे काही दुधखुळे नाहीत. त्यांना सर्व परिस्थिती समजते. तसेच आता उरलेले जे काही आमदार आणि खासदार आहेत. तेही एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणार आहेत, असा दावा नरेश म्हस्के यांनी केला.
तर दीपक केसरकर यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, कार्यकर्त्याना आपल्याकडे ठेवण्यासाठी, आपल्याकडून दूर जाऊ नयेत अशी विधानं केली जातात. त्यात काही चुकीचं आहे, असं मला वाटत नाही. अंधेरीचं उदाहरण आपल्यासमोर आहे. निवडणुकीत एकमेव राजकीय पक्ष मैदानात असताना ६९ टक्के लोक मतदानाकडे पाठ फिरवतात. त्यावरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. तसेच आमची शिवसेना ही खरी शिवसेना आहे, हे त्यांनी मान्य केलं पाहिजे असा टोला दीपक केसरकर यांनी लगावला आहे.