मुंबई : सोशल मीडियावरून मैत्री करायची. मैत्रीचे रूपांतर प्रेमात होताच लग्नाचे आमिष दाखवत व्हिडीओ कॉलवर अश्लील संवाद करायचा. सावज जाळ्यात अडकताच पुढे याचा आक्षेपार्ह व्हिडीओ बनावट वेबसाइटवर अपलोड करून पुढे पैशांची मागणी करणाऱ्या आसामच्या विकृताला एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दिलदार हुसेन युन्नोस अली (२३) असे अटक आरोपीचे नाव असून त्याने अशाप्रकारे किती महिलांना फसवले आहे, याबाबत पोलिस तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेची इन्स्टाग्रामवर दिलदार खान याच्याशी ओळख झाली होती. आरोपीने महिलेशी मैत्री केली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात होताच तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर, खान याने व्हिडीओ कॉल करून महिलेलाही आक्षेपार्ह व्हिडीओ कॉल करण्यास भाग पाडले. खान याने या व्हिडीओ कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग करून आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो फिर्यादी यांच्या नावाने फेक वेबसाइट बनवून त्यावर अपलोड केले.
याबाबत महिलेला समजताच त्यांना धक्का बसला. त्यांनी तत्काळ एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. आरोपीने गुन्हा दाखल झाल्यानंतरही महिलेला व्हिडीओ व्हायरल न करण्यासाठी पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली.
अन्य महिलाही जाळ्यात?
दिलदारने अशाच प्रकारे अनेकांना गंडविल्याचा संशय असून एमआयडीसी पोलिस अधिक तपास करत आहेत.
दुर्गम भागात असल्याची माहिती :
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखुन गुन्ह्याच्या तपासासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी तुकाराम कोयंडे, सायबर अधिकारी पोउनि प्रमोद कोतवाड, पो. अंमलदार गणेश नाईक, पोउनि खांगळ, पोलिस हवालदार काळे, पोलिस शिपाई भोसले तसेच तांत्रिक मदत पोलिस हवालदार पिसाळ यांचे विशेष पथक तयार करण्यात आले.
या गुन्ह्याच्या तांत्रिक तपासावरून आरोपी आसामच्या दुर्गम भागात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक खांगळ आणि त्यांच्या पथकाला आसाम येथे रवाना करण्यात आले. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तपासात त्याचे नाव दिलदार हुसेन युन्नोस अली (२३) असे असल्याचे समोर आले. तो आसामच्या पठासिमलो ब्लॉकमधील रहिवासी आहे.