एमआयडीसीतील उग्र दर्पाचा डोंबिवलीकरांना त्रास?
By admin | Published: February 25, 2015 10:36 PM2015-02-25T22:36:54+5:302015-02-25T22:36:54+5:30
एमआयडीसी परिसरातील निवासी भागात मंगळवारी रात्री साडेआठ ते दहाच्या सुमारास उग्र दर्पामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास झाला
डोंबिवली : एमआयडीसी परिसरातील निवासी भागात मंगळवारी रात्री साडेआठ ते दहाच्या सुमारास उग्र दर्पामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास झाला. त्यामुळे त्यांनी उशिराने रात्री मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार, या पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक एम. काळे यांनी असे काही घडले आहे का, याबाबतची पाहणी केली.
तसेच याबाबत प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनाही बोलवून घेतले. त्यांनी संयुक्तपणे पाहणी केली. विविध कंपन्यांच्या परिसरात जात त्यांनी असा उग्र दर्प कुठे येत आहे का, याची तपासणी केली. मात्र, त्यांना तसे काहीही आढळून आले नाही. त्यामुळे ते रिकाम्या हातीच कोणत्याही कंपनीवर कारवाई करता निघून गेल्याची टीका येथील काही रहिवाशांमधून करण्यात आली. यासंदर्भात बुधवारी येथील रहिवाशांनी मंडळाला तक्रार दिली असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)