अंबरनाथमध्ये MIDC ची मुख्य जलवाहिनी फुटली, दोन दिवस कमी पाणीपुरवठा
By पंकज पाटील | Published: November 8, 2022 10:07 PM2022-11-08T22:07:20+5:302022-11-08T22:09:33+5:30
अंबरनाथमध्ये एमआयडीसीचा जांभूळ जलशुद्धीकरण प्रकल्प आहे.
पंकज पाटील
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये एमआयडीसीची मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती एमआयडीसी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे.
अंबरनाथमध्ये एमआयडीसीचा जांभूळ जलशुद्धीकरण प्रकल्प आहे. या जलशुद्धीकरण प्रकल्पात उल्हास नदीचं पाणी शुद्ध करून ते संपूर्ण ठाणे जिल्ह्याला वितरित केले जाते. आज संध्याकाळच्या सुमारास या जलशुद्धीकरण प्रकल्पातून निघणारी मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली. त्यातच ही जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी काही काळ पाणीपुरवठा बंद देखील ठेवावा लागला. त्यामुळे आता पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती एमआयडीसी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिली आहे. याचा प्रामुख्याने अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली यासह ग्रामीण भागाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.