मधल्या सुट्टीत वडापाव, बर्गर, चिप्सवर ताव
By admin | Published: June 26, 2017 01:58 AM2017-06-26T01:58:58+5:302017-06-26T01:58:58+5:30
गेल्या काही वर्षांत बदलेल्या जीवनशैलीबरोबरीनेच खाद्यसंस्कृतीतही बदल झाले आहेत. घरचे शिजविलेले, सकस अन्न खाण्यापेक्षा पॅक बंद पदार्थ
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या काही वर्षांत बदलेल्या जीवनशैलीबरोबरीनेच खाद्यसंस्कृतीतही बदल झाले आहेत. घरचे शिजविलेले, सकस अन्न खाण्यापेक्षा पॅक बंद पदार्थ, जंक फूडला अधिक पसंती मिळते. घरातल्या मोठ्या माणसांच्या बरोबरीनेच लहान मुलेही मिटक्या मारत हे पदार्थ खाताना दिसतात. यामुळे लहान वयात वजन वाढणे आणि वाढत्या वजनाबरोबरीने येणारे आजार मुलांना जडत आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आल्याचे लक्षात घेऊन, शाळांमध्ये जंक फूड, अधिक शर्करा असणारे, मीठ अतिप्रमाणात असलेले, मेदयुक्त पदार्थांवर बंदी घालण्यात आली आहे. त्या बदल्यात भाजी-पोळीसारखा आहार द्यावा, असे असा निर्णय
राज्य शासनाने घेतला होता. शाळेच्या नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना आता उपहारगृहात सकस
आहार मिळेल, अशी अपेक्षा होती, पण ‘लोकमत’ प्रतिनिधींनी मुंबईतील शाळांमध्ये केलेल्या रिअॅलिटी चेकमध्ये मात्र, अपेक्षाभंग करणारे चित्र दिसून आले. काही शाळांनी जंक फूड, चॉकलेट्सवर बंदी आणली, पण वडापाव, समोसा पाव, चिवडा हे विकले जातात. कोणत्याही शाळेत सकस आहार मिळत नसल्याचे आढळून आले.
अनेक ठिकाणी
कँटीनच नाही
मानखुर्द मधील मातोश्री विद्यामंदिर या शाळेत कँटीनच नाही. सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना अल्पोपहार दिला जात असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
मानखुर्दमधील मोहिते पाटील विद्यालय, श्री साई विद्यालय, महात्मा गांधी मेमेरियल हायस्कूल, महाराष्ट्र बालविकास हायस्कूल या शाळांत उपहारगृह नाही.
परंतु मोहिते पाटील विद्यालय, साई विद्यालय आणि महाराष्ट्र बाल विकास हायस्कूलमधील विद्यार्थी मधल्या सुट्टीत शाळेच्या बाहेर जाऊन जंक फूडवर ताव मारताना पाहायला मिळतात.
बालमोहन विद्यामंदिर, दादर
वेळ - १.३० वाजता
या शाळेत प्रवेश करण्याचा प्रतिनिधीने प्रयत्न केला असता, त्याला प्रवेशद्वारावरच अडविण्यात आले. त्याच्याकडे चौकशी करून त्याला शाळेत प्रवेश नाकारला, पण शाळा सुटल्यावर बाहेर आलेल्या विद्यार्थ्यांशी प्रतिनिधीने संवाद साधला. त्या वेळी खरी परिस्थिती समोर आली. या शाळेच्या उपहारगृहात ज्या पदार्थांवर बंदी घातली आहे, ते सर्रासपणे मिळत असल्याची माहिती मिळाली. विद्यार्थी हे पदार्थ आवडीने खातात, असेही त्यांच्याकडून कळले.
संवाद
प्रतिनिधी - शाळेच्या उपहारगृहात जंक फूड मिळते का?
विद्यार्थी - होय.
प्रतिनिधी - कोणते-कोणते पदार्थ मिळतात.
विद्यार्थी - समोसा, दाबेली, वडापाव, कोबी मंचुरियन, चायनीज भेळ हे पदार्थ मिळतात.
प्रतिनीधी - अजून कोणते पदार्थ मिळतात का?
विद्यार्थी - नाही.
प्रतिनिधी - तुम्ही हे पदार्थ खाता का?
विद्यार्थी - होय, खातो ना, डबा असतोच.
प्रतिनिधी - शाळेच्या उपहारगृहात काही पदार्थ विकण्यास सरकारने बंदी घातली आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?
विद्यार्थी - होय, असा निर्णय झाल्याची माहिती आहे.
प्रतिनिधी - मग या निर्णयानुसार कोणत्या पदार्थांवर बंदी घालण्यात आली आहे?
विद्यार्थी - नाही, या पदार्थांची नावे माहिती नाहीत.
राजा शिवाजी विद्यालय, दादर
वेळ - दुपारी २ वाजता
या शाळेच्या तळमजल्यालाच उपहारगृह आहे. गतवर्षीपर्यंत या उपहारगृहात चॉकलेट, बिस्कीट खाद्यपदार्थ मिळत होते. मात्र, या वर्षीपासून शासनाने निर्बंध लादलेले पदार्थ विकणे कँटीनने बंद केले आहे. त्या बदल्यात भाजी, पोळी आणि पौष्टीक पदार्थ विकले जात आहेत. मात्र, या ठिकाणी फ्रँन्की दिली जात असल्याचे निदर्शनास आले.
संवाद -
प्रतिनिधी - नूडल्स मिळतील का?
कँटीन चालक (महिला) - नाही. आमच्याकडे नूडल्स मिळत नाहीत.
प्रतिनिधी - आइसक्रीम किंवा कोल्ड्रींक तरी मिळेल का?
कँटीन चालक (महिला) - नाही, हे पदार्थ आता इथे मिळत नाहीत. शासनाने हे पदार्थ विकण्यास बंदी घातली आहे.
प्रतिनिधी - किमान चॉकलेट किंवा कॅडबरी तरी मिळेल का?
कँटीनचालक (महिला) - गेल्या वर्षांपर्यंत विकणारे हे पदार्थ यंदापासून बंद केले आहेत. शाळेच्या बाहेरच्या परिसरात मिळतील.
प्रतिनिधी (कँटीनमधील पुरुष कर्मचाऱ्यास) - काउंटरवर फ्रँकी दिसत आहे.
कँटीनमधील पुरुष कर्मचारी : हो, व्हेज फ्रँकी आहे.
लीलावतीबाई पोद्दार सीनियर सेकंडरी स्कूल, सांताक्रुझ
वेळ - १ वाजता
शाळेत पोहोचल्यावर तळमजल्यावरील उपहारगृहात प्रतिनिधीने प्रवेश केला. मधल्या सुट्टीची वेळ असल्यामुळे उपहारगृहात विद्यार्थ्यांची गर्दी होती. या कँटीनमध्ये पिझ्झा, बर्गर, समोसा पावचा वास दरवळत होता. विद्यार्थ्यांना दिसतील, अशा पद्धतीने या पदार्थांची मांडणी करण्यात आली होती.
या उपहारगृहात प्रवेश केल्यावरच विद्यार्थ्यांची गर्दी दिसून आली. यातील अनेक विद्यार्थी हे पिझ्झा, बर्गर, हॉट डॉग अशा पदार्थांसाठी रांगेत उभे होते, तसेच वडापाव, समोसा पावालाही मागणी होती. त्याचबरोबरीने कोल्ड्रिंक आणि अन्य शीतपेये उपलब्ध होती. यातील काही विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केल्यावर विद्यार्थ्यांनी सांगितले की, डबा आणत नाही. त्यामुळे रोज मधल्या सुट्टीत कँटीनमध्ये येऊन हेच जंक फूड खातो, तर काहींच्या बोलण्यातून असे दिसून आले की, उपहारगृहात उधारीही ठेवली आहे. यावरूनच विद्यार्थी रोजच्या रोज याच कँटीनमधील या पदार्थांवर ताव मारत असल्याचे स्पष्ट झाले.
गोखले एज्युकेशन सोसायटीचे आर.एम. भट हायस्कूल, परळ
वेळ - दुपारी १ वाजता
आचार्य दोंदे विद्यानगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शाळेच्या आवारतच कँटीन आहे. शासनाने निर्बंध लादलेले अनेक पदार्थ या ठिकाणी सर्रासपणे विकले जात आहेत. कॅडबरी, चॉकलेट, आइसक्रीम, कोल्ड्रिंकसोबतच ‘पेप्सीकोला’ही मिळतो.
संवाद -
प्रतिनिधी (कँटीन चालकास) - खायला काय मिळेल?
कँटीनचालक - वडापाव, पॅटीस. काय हवे आहे?
प्रतिनिधी - नूडल्स मिळतील का?
कँटीनचालक - नाही. नूडल्स नाहीत.
प्रतिनिधी - कॅडबरी किंवा कोल्ड्रींग मिळेल का?
कँटीनचालक - होय, पण आता सामान काढून ठेवले आहे. थोड्या वेळाने मिळेल. चॉकलेट, कॅडबरी, कोल्ड्रींक मिळेल.
सेंट फ्रान्सिस
हायस्कूल, मालाड
वेळ - १० वाजता
या शाळेत प्रतिनिधी गेला होता, तेव्हा काही पालकांची भेट झाली. उपहारगृहाला भेट देण्याआधी पालकांशी संवाद साधताना प्रतिनिधीला काही माहिती हाती लागली. यामध्ये विद्यार्थ्यांना सकस आहार मिळत नाही, तर शासनाच्या आदेशाच्या उलट सर्व पदार्थ खुलेआमपणे विकत मिळतात.
संवाद -
प्रतिनिधी - तुमचे कोण या शाळेत शिक्षण घेत आहे?
पालक - माझी मुलगी या शाळेत शिकते.
प्रतिनिधी - तुम्ही मुलीला रोज टिफिन देता?
पालक - होय, रोज देतो टिफिन.
प्रतिनिधी - शाळेच्या उपहारगृहात काय पदार्थ मिळतात?
पालक - शाळेच्या कँटीनमध्ये वडापाव, समोसा पाव, चॉकलेट्स, कोल्ड्रिंक, चिप्स आणि बिस्किटे इत्यादी पदार्थ मिळतात.
पालकांशी संवाद साधल्यावर प्रतिनिधी उपहारगृहात गेल्यावर हीच परिस्थिती दिसून आली. दुकानात ज्या प्रमाणे खाद्यपदार्थ, कोल्ड्रिंक्स विकण्यास सजवून ठेवलेली असतात. त्याचप्रमाणे, उपहारगृहात दिसून आले. त्याचबरोबर, या ठिकाणी हे पदार्थ खाताना काही विद्यार्थीही दिसले.
पार्ले टिळक विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूल, विलेपार्ले
वेळ - १२ वाजता
शाळेच्या आवारात फेरफटका मारून थेट शाळेच्या उपहारगृहात प्रवेश केला, तर उपहारगृहात वडापाव सर्रासपणे विकला जात असल्याचे निर्दशनास आले. काही विद्यार्थी वडापाव खातानाही दिसले.
संवाद -
प्रतिनिधी - काका खायला काय आहे?
कँटीन चालक - वडापाव आहे.
प्रतिनिधी - दुसरे काही मिळेल का?
कँटीन मालक - नाही, फक्त वडापाव.
नूतन विद्यामंंदिर, मानखुर्द
वेळ - सकाळी १० वाजता
या शाळेत तीन वर्षांपूर्वीपर्यंत वडापाव, समोसा आणि पॅटीस हे पदार्थ मिळत होते, परंतु तीन वर्षांपूर्वी पालकांनी या पदार्थांची विक्री बंद करावी, अशी सूचना शाळा प्रशासनाला केली होती. त्याची दखल घेत शाळेने या तेव्हापासूनच हे पदार्थ विकण्यास बंदी घातली आहे.
प्रतिनिधी - समोसा मिळेल का?
विक्रेता - नाही.
प्रतिनिधी - मग काय काय आहे?
विक्रेता - इथे फक्त भेळ मिळेल.
प्रतिनिधी - कोल्ड्रिंक तरी मिळेल का?
विक्रेता - नाही.
प्रतिनिधी - भेळ विकण्यास शाळेने परवानगी दिली आहे का?
विक्रेता - होय.
प्रतिनिधी - पूर्वी समोसा वगैरे मिळत होते ना?
विक्रेता - हो, पण आता ते बंद केले आहे.
छबिलदास हायस्कूल, दादर
शाळेच्या आवारात छोटे दुकान आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी खाऊ मिळतो, परंतु त्यामध्ये फक्त चॉकलेट, फरसाण, चिवडा आणि तत्सम पदार्थ मिळतात. शाळेच्या आवारात शिजविलेले कोणतेही पदार्थ मिळत नाही.