राज चिंचणकरमुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या यंदा मुलुंड येथे रंगणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात थेट ‘मध्यरात्रीचे पडघम’ वाजणार आहेत. १३ ते १५ जून या कालावधीत होत असलेल्या या नाट्य संमेलनाच्या तीन दिवसांचे कार्यक्रम मध्यरात्री साडेबारा वाजता सुरू होणार आहेत.या नाट्य संमेलनात विविध कार्यक्रमांची रेलचेल असली, तरी १३, १४ व १५ जूनच्या थेट मध्यरात्री दुसºया दिवसांच्या कार्यक्रमांना प्रारंभ होणार आहे. रात्री १२.३०, पहाटे ३, सकाळी ६ अशा वेळा यासाठी ठरविण्यात आल्या आहेत. या वेळा लक्षात घेता या नियोजित कार्यक्रमांना कसा प्रतिसाद मिळेल, याविषयी नाट्यसृष्टीत चर्चा आहे. बाकी दिवसभर विविध कार्यक्रम सादर होणार आहेत. १३ जूनला संमेलनाची सुरुवात होईल.१४ जूनच्या पहाटे ३ वाजता यमुनाबाई वाईकर यांना समर्पित केलेला ‘रंगबाजी’ हा कार्यक्रम आहे. त्यानंतर प्रात:स्वर, बालनाट्य, एकांकिका आदी कार्यक्रम रंगणार आहेत. दुपारच्या सत्रात ‘सांस्कृतिक आबादुबी’ या शीर्षकांतर्गत परिसंवाद आहे. नाट्य परिषदेचा दरवर्षीचा १४ जूनचा नाट्याचार्य गो.ब.देवल पुरस्कार वितरण सोहळा याच दिवशी संध्याकाळी आहे. रात्री ‘संगीतबारी’ झाल्यावर, मध्यरात्री साडेबारा वाजता लोककलेचा ‘जागर’ करण्यात येणार आहे.१५ जून रोजी सकाळपासून एकपात्री महोत्सव, एकांकिका, प्रायोगिक नाटके आदी कार्यक्रम झाल्यावर संध्याकाळी खुले अधिवेशन व नाट्य संमेलनाचा समारोप सोहळा आहे. रात्री ‘रंगयात्रा’ हा कार्यक्रम; तर मध्यरात्री ‘सुखन’हा कार्यक्रम होऊन, १६ जूनच्या पहाटे या नाट्य संमेलनाची सांगता होणार आहे.
नाट्य संमेलनाचे ‘मध्यरात्रीचे पडघम’..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 6:14 AM