मुंबई : १४व्या मुंबई आंतरराष्ट्रीय माहितीपट व अॅनिमेशन चित्रपट (मिफ्फ) महोत्सवाच्या नोंदणीकरिता केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर तरुणांच्या रांगा लागल्या. या द्वैवार्षिक महोत्सवात चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच त्यांच्या कामाचे सादरीकरण केले. या महोत्सवादरम्यान सामाजिक विषयावर विद्यार्थ्यांनी दर्जेदार माहितीपट सादर करून प्रेक्षकांचे मन जिंकले.फिल्म डिव्हिजनच्या जे. बी. हॉलमध्ये रेन टीव्हीच्या साहाय्याने झालेल्या स्क्रीनिंगमध्ये २९ विद्यार्थ्यांनी कार पुलिंग, जलसंवर्धन, बाल आहार, जागतिक तापमानवाढ आदी विषयांवर माहितीपट सादर केले. ‘मिफ्फ २०१६’ मध्ये नाबार्डने पहिल्यांदाच भाग घेतला. नाबार्डच्या वतीने विद्यार्थ्यांनी ‘ग्रामीण भारतातील हीरो’ या विषयावर लघुपट तयार करून प्रेक्षकांची दाद मिळविली. तसेच ‘सेलीब्रीटिंग डेव्हलपमेंट’ या विषयावर डिझाइन व माध्यमांच्या विद्यार्थ्यांनी १०० हून अधिक माहितीपट तयार केले. ‘ग्रामीण भारत’ या विषयावर विद्यार्थ्यांनी चित्रपटाद्वारे प्रकाश टाकला. ज्यामध्ये मुंबईतील झेविअर्स इन्स्टिट्यूट आॅफ कम्युनिकेशन, व्हिसलिंग वूड इंटरनॅशनल आणि सृष्टी स्कूल आॅफ आर्ट्स, डिझाइन व टेक्नोलॉजीचा समावेश होता. नाबार्डच्या विकासात्मक कामांचे विद्यार्थ्यांनी चित्रीकरण केले. (प्रतिनिधी)
मिफ्फमध्ये सामाजिक विषयांवर प्रकाशझोत
By admin | Published: February 03, 2016 2:37 AM