मुंबई : आधीच्या युती शासनाच्या काळामध्ये लाखो गिरणी कामगारांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होऊ न शकल्याने नाराज गिरणी कामगार विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनावेळी मोर्चा काढणार आहेत. गिरणी कामगारांच्या सर्व श्रमिक संघटनेने याबाबत राज्य सरकारला इशारा दिलो. गुरुवारी १९ डिसेंबरला हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे संघटनेने सांगितले.
गेली २५ वर्षे मुंबईतील गिरणी कामगार स्वत:च्या रोजगारापासून दुरावला गेला आहे. त्याचे राहते घरही गिरणी मालकांनी व टोलेजंग इमारती बांधणाऱ्यांनी हिसकावले. मात्र ज्या गिरणी कामगारांच्या बळावर या गिरण्या उभ्या राहिल्या, त्या कामगारांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सर्व श्रमिक संघटनेने केला आहे.फडणवीस सरकारच्या काळात गिरणी कामगारांच्या एकाही नवीन घराचे बांधकाम करण्यात आले नसल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष बी.के आंब्रे यांनी केला आहे.
सरकारकडून मुंबईत १ लाख ७३ हजार गिरणी कामगारांपैकी केवळ ११ हजार ९७७ इतक्या गिरणी कामगारांनाच घरे मिळाली आहेत. उर्वरित १ लाख ६१ हजार गिरणी कामगारांना घरे कधी मिळणार, असा त्यांचा सवाल असून मुंबई व उपनगरात सरकारच्या ताब्यात असलेल्या जमिनीचा काही भाग गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना स्वयंविकासासाठी घरबांधणीकरिता देण्यात यावा, अशी मागणीही सर्व श्रमिक कामगार संघटनेकडून सरकारकडे करण्यात आली आहे.