गौरी टेंबकर - कलगुटकर। लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उन्हाळी सुट्टीत गावी जाणाऱ्या प्रवाश्यांची खासगी बसचालकांकडून सुरू असलेली लुटमार चर्चेचा विषय बनला असताना, एका लक्झरी बसकडून आंब्याच्या पेट्यांच्या डिलिव्हरी करण्यासाठी प्रवाशांना वेठीस धरण्याचा प्रकार रविवारी घडला. गोव्याहून मुंबईत येणाऱ्या लक्ष्मी ट्रॅव्हल्सची बस पेट्या उतरविण्यासाठी नवी मुंबई, मुंबईत ठिकठिकाणी थांबविण्यात येत होती. वेळेत पोहोचण्यासाठी अनेक ठिकाणी वाहतुकीचे सिग्नल तोडण्याचा ‘प्रताप’ चालकाकडून करण्यात येत होता. अखेर वांद्रे येथील चौकात वाहतूक पोलिसांनी कारवाई केल्यानंतर, प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. लक्ष्मी ट्रॅव्हल्सची बस शनिवारी रात्री गोव्याहून बोरीवलीला निघाली होती. त्यामध्ये प्रवाशांसह, गोवा, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली परिसरातील ६० ते ७० आंबे व जांभळाचे बॉक्स होते. ही बस रविवारी सकाळी साडेदहा वाजता बीकेसी येथे पोहोचली असताना, चौकातील वाहतुकीचा सिग्नल सुरू असताना, चालकाने न थांबता बस पुढे दामटण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी लक्झरीत ७, ८ लहान मुलांसह ३०च्या वर प्रवासी होते. चालकाच्या बेपरवाईमुळे अपघात होण्याची शक्यता होती. तेथे बंदोबस्ताला असलेल्या वाहतूक पोलिसाने सिग्नल तोडल्याप्रकरणी दंड आकारला. दरम्यान, नवी मुंबई व मुंबईत पेट्यांची डिलिव्हरी करण्यासाठी बस जवळपास १७ ते १८ ठिकाणी थांबविली जात होती. त्यामुळे एरवी साधारण साडेसात वाजता बोरीवलीत पोहोचणारी बस साडेदहा वाजले, तरी वांद्रे परिसरात होती. डिलिव्हरीसाठी ठिकठिकाणी बस थांबविणारा चालक व क्लीनर प्रवासी नैसर्गिक विधीसाठी बस थांबविण्याची प्रवाशांची विनंती मात्र, धुडकावून लावीत होते. अखेर सर्व प्रवाशांनी विरोध केल्याने, चालकाने एके ठिकाणी बस थोडा वेळ थांबविली, असे प्रवासी दीपक बोरे यांनी सांगितले.
आंब्याच्या डिलिव्हरीसाठी खासगी बसचालकांकडून प्रवासी वेठीस!
By admin | Published: May 16, 2017 1:02 AM