स्थानिकांनो दहिसरला स्थलांतरित व्हा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:06 AM2021-07-11T04:06:32+5:302021-07-11T04:06:32+5:30

मुंबई : गोरेगाव पश्चिमच्या एमएमआरडीए इमारतीत असलेल्या अमन पार्क को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या सातव्या मजल्यावर आरसलान अन्सारी (वय ८) याच्यावर ...

Migrate to Dahisar, locals! | स्थानिकांनो दहिसरला स्थलांतरित व्हा !

स्थानिकांनो दहिसरला स्थलांतरित व्हा !

Next

मुंबई : गोरेगाव पश्चिमच्या एमएमआरडीए इमारतीत असलेल्या अमन पार्क को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या सातव्या मजल्यावर आरसलान अन्सारी (वय ८) याच्यावर स्लॅब कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला. जर्जर इमारती नागरिकांसाठी धोकादायक असल्याने त्यांना दहिसरमध्ये स्थलांतरित करण्याची एमएमआरडीएची योजना आहे. मात्र, त्यामुळे मुलाच्या शिक्षणासह बऱ्याच असुविधा होणार असल्याने स्थानिकांमध्ये असंतोष पसरला आहे.

आरसलानचा मृत्यू झाला त्या इमारतीमधील अनेक घरांत अशाच प्रकारे स्लॅबचे प्लास्टर कोसळत आहे. त्यामुळे आरसलानप्रमाणे पुन्हा एखाद्याच्या जिवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरसलानचे मामा अमीर शेख यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या सहा महिन्यांपासून खोलीचे घरभाडे वसूल करायला येणाऱ्या मालकिणीला दुरुस्तीबाबत आरसलानची आई फहमीदा या विनंती करत होत्या. मात्र, तिने त्याकडे दुर्लक्ष केले. माझ्या बहिणीचा तो एकुलता मुलगा होता जो आता कधीच परत येणार नाही. त्यामुळे त्याच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या एमएमआरडीएचे अधिकारी, तसेच संबंधित कंत्राटदार आणि घरमालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी माझी मागणी आहे. याबाबत रविवारी गोरेगाव पोलिसांनी मला भेटायला बोलावले असून भाच्याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर कायद्याचा बडगा उगारला जाईल, असा मला विश्वास आहे.

दरम्यान, शुक्रवारी हा अपघात घडल्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास एमएमआरडीएचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते, तसेच सोसायटीतील सहाजणांचे शिष्टमंडळ वांद्रे कार्यालयात जाऊन भेटून आले. तेव्हा त्यांना दहिसरला स्थलांतरित व्हा, असे सांगण्यात आल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र, कोरोना आणि पावसाच्या दिवसात अनोळखी ठिकाणी गेलो तर मुलांच्या शाळेचा मोठा प्रश्न पुढे निर्माण होईल, तसेच बऱ्याच लोकांचा रोजगार याठिकाणी आहे. त्यामुळे त्यांच्याही पोटावर पाय येईल त्यामुळे या प्रस्तावाबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे.

याबाबत गोरेगाव पोलिसांना विचारले असता अद्याप याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीश गोस्वामी यांनी दिली.

Web Title: Migrate to Dahisar, locals!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.