मुंबई : मुंबईत वाढते प्रदूषण, बांधकामांची गर्दी; अशी संकटे आली, तरी मुंबईत वस्तीसाठी येणाऱ्या फ्लेमिंगो (रोहीत पक्षी) पक्ष्यांप्रमाणे इतरही पक्ष्यांना मुंबईबाबतची ओढ अजूनही कायम आहे. बीएनएचएसतर्फे जानेवारी महिन्यात मुंबईच्या किनाऱ्यांवर आगमन झालेल्या फ्लेमिंगो पक्ष्यांची संख्या १ लाख २१ हजारांच्या घरात गेली होती, तसेच इतरही पक्षी स्थलांतर करतात. मात्र, ते ठरावीक हंगामापुरतेच येतात आणि पुन्हा आपल्या मायदेशी परततात. अशा सुमारे चार हजार पक्ष्यांच्या प्रजाती नियमित स्थलांतर करत असल्याचे पक्षीतज्ज्ञांचे म्हणणे आहे.पक्षी निरीक्षक कुणाल मुनसिफ यांनी या संदर्भात सांगितले की, पक्ष्यांच्या स्थलांतराचे दोन प्रकार प्रामुख्याने दिसून येतात. त्यातील पहिला म्हणजे देशांतर्गत स्थलांतर आणि दुसरा देशा बाहेरील स्थलांतर. हिमालयामध्ये जे पक्षी दिसून येतात. ते हिवाळ्यामध्ये इतर राज्यांत स्थलांतर करतात. फेबु्रवारी ते मार्च महिन्यात उन्हाच्या झळा बसू लागल्या की, काही पक्षी हिमालयाकडे प्रस्थान करतात.बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या पक्षी संशोधक तुहीना कट्टी यांनी सांगितले की, सेंट्रल एशियन फ्लायवे इथून पक्षी भारतामध्ये १८२ पक्ष्यांच्या प्रजाती स्थलांतरित होतात. महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त पक्ष्यांचे स्थलांतर हे हिवाळ्यात होते. काही पक्षी रशियामध्ये प्रजनन करून ज्यावेळी तिथे थंडी जाणवायला लागते, तेव्हा ते स्थलांतरित होऊन संपूर्ण हिवाळा भारतात घालवतात. रशिया, कझाकिस्थान आणि मंगोलिया या ठिकाणी पक्षी उन्हाळ्याच्या हंगामामध्ये स्थलांतरित होतात.शिवडी ते न्हावाशेवा या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पामुळे शेकडो तिवरांची कत्तल करण्यात आली. सागरी विकास प्रकल्पांमुळे मुंबईमध्ये प्लेमिंगो पक्ष्यांची संख्या कमी होईल, अशी भीती पक्षीप्रेमींना वाटत होती. सर्वेक्षणानुसार फ्लेमिंगो गणनेनुसार पक्ष्यांची संख्या वाढत आहे.स्थलांतरामध्ये सुमारे ४ हजार एवढ्या पक्ष्यांच्या प्रजाती नियमित स्थलांतर करतात. स्थलांतरादरम्यान २५ हजार ७४९ किलोमीटर सरासरी अंतर पक्षी कापतात. आर्कटिक टर्न या पक्ष्याने स्थलांतरासाठी कापलेले सर्वाधिक अंतर ७० हजार ९०० किलोमीटर आहे, तसेच रोज सरासरी ८ तास एवढा वेळ उड्डाण करून अंतर कापले जाते.
चार हजार पक्ष्यांच्या प्रजाती नियमित करतात स्थलांतर; प्रदूषण वाढले, तरी मुंबईची ओढ कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 5:10 AM