४,५०० रेल्वे कर्मचाऱ्यांचे कुर्डूवाडीत स्थलांतर, मध्य रेल्वेच्या ढिसाळ नियोजनाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 05:42 AM2018-03-15T05:42:03+5:302018-03-15T05:42:03+5:30
परळ टर्मिनस उभारणीमुळे परळ वर्कशॉप बंद करण्यात येणार असल्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने केली. रेल्वे प्रशासन सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथे वर्कशॉप उभारणार आहे.
- महेश चेमटे
मुंबई : परळ टर्मिनस उभारणीमुळे परळ वर्कशॉप बंद करण्यात येणार असल्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने केली. रेल्वे प्रशासन सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथे वर्कशॉप उभारणार आहे. परिणामी, या वर्कशॉपमध्ये परळ टर्मिनसमधील तज्ज्ञ आणि प्रशिक्षित कर्मचाºयांचे स्थलांतरण होणार आहे. मध्य रेल्वेच्या ढिसाळ नियोजनाचा फटका परळ वर्कशॉपमधील चार हजार ५०० रेल्वे कर्मचाºयांना बसण्याची शक्यता आहे.
परळ वर्कशॉपमध्ये भारतीय रेल्वेच्या आपत्कालीन क्रेनची देखभाल आणि दुरुस्ती करण्याचे काम चालत असे. त्याचबरोबर, नॅरोगेज मार्गावरील इंजिनची देखभाल आणि बांधणीचेदेखील काम येथे चालत असे. आपत्कालीन क्रेन दुरुस्तीसाठी तज्ज्ञ आणि प्रशिक्षित रेल्वे कर्मचाºयांची आवश्यकता असते, असे रेल्वे कर्मचारी सध्या परळ वर्कशॉपमध्ये कार्यरत आहे. परिणामी, नव्याने प्रशिक्षित करण्यापेक्षा सद्यस्थितीतील कर्मचारी तिकडे नेणे मध्य रेल्वेला सोईस्कर असल्याचे वरिष्ठ अधिकाºयांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. परळ वर्कशॉप बंद झाल्याने, रेल्वे प्रशासनाने सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथेदेखील काही कामे सुरू करण्यात येणार आहेत.
परदेशातून आधुनिक बनावटीची १७५ टन वजनी क्षमतेची टेलिस्कोपिक क्रेन मध्य रेल्वेच्या ताफ्यात लवकरच दाखल होणार आहे. या क्रेनची देखभाल आणि दुरुस्ती परळ वर्कशॉपमध्ये करण्यात येण्याचे नियोजन होते. मात्र, परळ वर्कशॉप बंद होत असल्याने, अस्तित्वात असलेल्या क्रेनसह आधुनिक क्रेनचादेखील देखभाल-दुरुस्तीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
>परळ टर्मिनससाठी घेतला निर्णय
देशातील सर्वांत मोठे रेल्वे वर्कशॉप म्हणून परळ वर्कशॉप परिचित आहे. १३८ वर्षे जुने असलेले परळ वर्कशॉप परळ टर्मिनससाठी बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. यामुळे परळ टर्मिनसचा मार्ग सुकर झाला असला, तरी परळ वर्कशॉपमधील कर्मचाºयांच्या अडचणीत वाढ होण्याचे संकेत मिळत आहे.